
प्रतिनिधी :
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील तिल्हेर गावात अवैध खदानामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले असून सदर खदानावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सदर प्रकरणी वसई तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील तिल्हेर गावात सर्वे नंबर ८०/४ व ९०/२ या भूखंडावर गिल्टर फ्रान्सिस डॉ निस यांचे खदान चालत असून सदर खदानामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. काही ग्रामस्थांनी थेट तहसीलदार वसई यांच्याकडे लिखित निवेदन देऊन सदर खदानावर कारवाईची मागणी केली आहे.
क्रेशर मशीनद्वारे दगड फोडण्याचे काम चालू असताना त्याच्या हादऱ्याने आजूबाजूच्या घरांना भेगा पडलेल्या आहेत. दगड उडून घरांवर पडून नुकसान झालेले आहे. गर्भवती महिलांना त्रास होत आहे. खदानातून मोठ्या प्रमाणात धूळ उडून फळझाडांचे नुकसान होते. तरी सदर खदान तत्काळ बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सदर प्रकरणी ग्रामस्थांनी तलाठी सुधाकर जाधव, मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या असता त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. यावरून अधिकाऱ्यांच्या संरक्षणात सदर खदान चालत आहे हे सिद्ध होते. नागरिकांच्या अनेक तक्रारी शासकीय कार्यालयांमध्ये पडून असतात. त्यावर कारवाई होत नाही.
