
साप्ताहिक युवाशक्ती एक्सप्रेसच्या पाठपुराव्याला यश
वसई(प्रतिनिधी)-वसई तालुक्यातील तलाठी सजा कामण हद्दीत मोडणाऱ्या नागले गावात
तिवरांची झाडे तोडल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्याऱ्या तलाठी अभिमन्यू तरेची अखेर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी उचलबांगडी केली आहे.तसेच तिवरांची कत्तल करणाऱ्या प्रमोद गोतारणे, विनोद हजारे व चिंतामण पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत.एकीकडे शासन तिवरांच्या संवर्धनासाठी विविध अनेक कायदे बनवत आहेत. शिवाय तिवरांची कत्तल रोखण्यासाठी आणि कत्तल झाल्यास कारवाई करण्यासाठी शासनाने पालघर जिल्ह्यात तालुका व जिल्हास्तरीय कांदळवन संरक्षण संवर्धन समिती स्थापन केली आहे.असे असताना शासनाचे अधिकारीच तिवरांची कत्तल रोखण्याऐवजी त्याची कत्तल करणाऱ्यांची पाठराखण करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तिवरांची कत्तल होऊनही कत्तल न झाल्याचा अहवाल सादर करत वरिष्ठांचीच दिशाभूल या तलाठी वर्गाकडून करण्यात येत होती. असाच काहीसा प्रकार वसई तालुक्यातील नागले गावात उघडकीस आला होता.
गेल्या काही दिवसांपासून नागले येथील रहिवासी रत्नाकर पाटील हे येथील तिवरांची कत्तल रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नागले खाडीला लागून असलेली सुमारे १२५-१५० तिवरांच्या झाडांची कत्तल झाल्याचा प्रकार तक्रारदार रत्नाकर पाटील यांनी पुराव्यानिशी उघडकीस आणला होता. रत्नाकर पाटील यांनी तिवरांची कत्तल करणाऱ्या प्रमोद नारायण गोतारणे, विनोद विजय हजारे व चिंतामण सावळाराम पाटील यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली होती. त्या संदर्भात त्यांनी वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, पोलीस निरीक्षक वालीव यांच्याकडे दि. ९ डिसेंबर २०२० रोजी तक्रारही दाखल केली होती. परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्याची बाब साप्ताहिक युवाशक्ती एक्सप्रेसच्या पत्रकार रुबिना मुल्ला यांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच यासंदर्भात युवाशक्ती एक्सप्रेसच्या मागील अंकात तिवरांच्या कत्तलीचे वृत्त ही प्रसिद्ध झाले होते. दुसरीकडे तिवरांच्या झाडांच्या कत्तली संदर्भात वृत्त प्रसिद्ध होऊन तसेच वरिष्ठांनी आदेश देवूनही तलाठी अभिमन्यू तरे हे तिवरांची कत्तल करणाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. त्यामुळे तरे यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पुढे येत होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी अभिमन्यू तरे यांची उचलबांगडी केली. त्याठिकाणी आता संतोष शिरसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तिवरांची झाडे तोडल्या प्रकरणी कारवाई करण्याबाबत दि. १.१.२०२१ रोजी युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबीना मुल्ला यांनी तहसीलदार वसई यांना लिखीत तक्रार दिली होती. दि. ८.१.२०२१ रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना तर तक्रारी प्रकरणी कारवाई करीत नसल्या बद्दल तलाठी सजा कामण अभिमन्यू तरे यांच्यावर कारवाई करण्याबाबत दि. ८.१.२०२१ रोजी वसई तहसीलदार यांना तक्रार दिली होती.