

गाव मौजे दिवानमान वसई येथील दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जमीन सर्वे क्र.176 व सर्वे क्र.177 या जमीन मिळकती दफन भूमीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे.सदर जागेवर महानगरपालिकेमार्फत आरक्षित भूखंडावर पक्के बांधकाम करुन दफनभूमी तयार करण्यात आले होते सदरची जागा ही सीआरझेड मध्ये येत असल्याने सदर जागेवर महानगरपालिकेने बांधकाम करण्याअगोदर संबंधित विभागाशी पत्र व्यवहार करुन बांधकाम परवानगी घेणे आवश्यक होते.परंतू महानगरपालिकेने परवानगी न घेता आरक्षित जागेवर पक्के कुम्पणाचे बांधकाम केले होते सदर जागेवरील बांधकाम अनधिकृत असल्याने राष्ट्रीय हरित लवादा कोर्ट पुणे यांनी सदर जागेमधील सर्व अनधिक्रूत बांधकाम निष्काशित करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकाम निष्काशित केले आहे. सदर जागेचा वापर दफनभूमी साठी करावयाचे असल्यास त्यासाठी नाहरकत दाखला देण्यास महानगरपालिकेला कोणतीही कायदेशीर अडचण नाही.कारण ज्या कामासाठी शासनाने जागा आरक्षित केली आहे त्याच कामाकरिता जागेचा वापर होणार आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांना सदर जागेमध्ये दफनभूमीचा वापर सुरु करावयाचे असल्यास महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारची हरकत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.सदर जागेमध्ये दफनभूमीचा वापर सुरु करण्यात यावे यासाठी अनेक सामाजिक संघटना व येथील मुस्लिम बांधवांनी अनेक वेळा धरणे आंदोलने व उपोषण केलेले आहे.
तरी देखील अद्याप महानगरपालिकेने दफनभूमीचा वापर सुरु करण्यास त्यांची कुठल्याही प्रकारची हरकत नसल्याबाबतचे पत्र अद्याप कोणालाही दिलेले नाही.सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची असुन महानगरपालिका जाणून बुजून दुर्लक्ष तर करीत नाही ना ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे.बहुजन महा पार्टीचे महासचिव
शमशुद्दीन खान यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त बी.जी.पवार व उपसंचालक नगर रचना विभाग यांना दिनांक 11/09/2019 रोजी पत्र देवून तात्काळ नाहरकत दाखला देण्याबाबत प्रशासनास कळविले आहे.वरील प्रकरणी शमशुद्दीन खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जी जमीन मिळकत ज्या वापरासाठी आरक्षित असते ते वापर करण्यास महानगरपालिकेची हरकत नसल्याबाबतचे पत्र देणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे व नाहरकत दाखला देण्यास महानगरपालीकेस कोणतेही कायदेशीर अडचण नाही. त्यामुळे महानगरपालिकेने आम्हाला तात्काळ दफनभूमीसाठी नाहरकत दाखला द्यावा जर महानगरपालिकेने आरक्षित जमिनीवर दफनभूमीचा वापर करण्यास त्यांचा नाहरकत दाखला दिला नाही तर वसई तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येवून तीव्र आंदोलन करणार आहेत व त्यास उद्भवणा-या परिणामांची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे शमशुद्दीन खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.