
प्रतिनिधी
विरार, दि. 12 – या वर्षी झालेल्या मुसळधार वृष्टीत कोल्हापूर, सांगलीसह कोकण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणी आलेल्या महापुरात अनेक संसार उघड्यावर आले आहेत. शेतीचेही नुकसान झाले आहे. हे नुकसान कधीही भरून येणार नाही, असे आहे. या महासंकटात महाराष्ट्रभरातून आपल्या बांधवांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आलेले असतानाच, नालासोपारा पश्चिम निळेगाव येथील गावदेवी गोविंदा पथकानेही पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा संकल्प केला आहे.
या कर्तव्यभावनेतून या वर्षीच्या दहीकाला उत्सवात मिळणारे सर्व बक्षीस गावदेवी गोंविदा पथक कोल्हापूर, सांगलीसह कोकणातील पूरग्रस्तांना देणार आहे. गावदेवी गोंविदा पथकाने रविवारी महाराष्ट्रात ‘आगमनाधिश’ म्हणून संबोधल्या जाणार्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या शतक महोत्सवी वर्षाच्या आगमनावेळी सहा थरांची चक्री सलामी दिली आहे. त्याआधी 2015मध्ये मुंबईतील उमरखाडी येथे सराव शिबिरात सर्वप्रथम सात थरांची चक्री सलामी दिली होती. 2017 मध्ये कणकवली येथील नितेश नारायणराव राणे यांच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन केवळ 17 मुलांत स्कॉटवर सहा थर लावून सर्वांची मने जिंकली आहेत. 2018 सालीही दहीकाल्याच्या दिवशी 7 वेळा सात थर लावून यशस्वी उतरले होते.
गावदेवी गोंविदा पथक केवळ क्रीडाच नव्हे; तर सामाजिक कामातही अग्रेसर आहे. सामाजिक वसा म्हणून मागील वर्षी पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील कुपोषणाची गंभीर दखल घेऊन पथकाने औषधोपचार शिबीर व अन्नधान्य, कपडे व इतर दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप केले होते.
