

विरार – गेल्या वेळी पालघर आणि वसईत आलो होतो, तेव्हा खासदार घेऊन गेलो. आता यावेळी जिल्ह्यातून सहा आमदार घेऊन जायला आलो असून, राज्यात पुनश्य येणाऱ्या शिवसेना भाजप महायुतीच्या शासनाला बळकटी देण्यासाठी स
र्वांनी धनुष्यबाणाला मतदान करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी मानवेलपाडा, विरार (पूर्व )येथे जाहीरसभेत केले.
शिवसेना भाजप महायुतीचे वसई आणि नालासोपारा येथील उमेदवार अनुक्रमे विजय पाटील आणि प्रदीप शर्मा यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित आदींची भाषणे यावेळी झालीत. विविध संघटना आणि पक्षातील काही लोकांना ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.
वसईतील सत्ताधारी पक्ष, बहुजन विकास आघाडी, तसेच येथील विद्यमान आमदार द्वयांच्यावर प्रत्यक्ष नांव टाळून कडक टीका करीत, उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लोकसभेला दिला तसा आणखी एक दणका देऊन यांची येथील दादागिरी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता मुळासकट उखडून फेका.नळाला पाणी नाही आणि दारातून मात्र घरांत पाणी शिरते. नाले, रस्ते अरुंद, पाण्याच्या निचऱ्याची बोंब, आरोग्य आणि शिक्षणाची वाताहत हे सगळं किती दिवस सहन कारणार? यातून परिवर्तन घडविण्यासाठी आता महायुतीच्या येथील दोन्ही उमेदवाराना विधानसभेत पाठवा.
गेली पाच वर्ष महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने लोकाभिमुख काम केले असून सरकार कुठे चुकले, तर चार गोष्ठी सुनवायलाही आम्ही कमी केले नाही. याही वेळी महायुतीचीच भगवी सत्ता येणार आहे. शिवसेनेने वचन दिल्याप्रमाणे एक रुपयात आरोग्य सेवा आणि दहा रुपयात पोटभर जेवण आम्ही देणार आहोत. शिवरायांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र घडविण्यासाठी भगवे शासन कटिबद्ध असल्याचे आग्रही प्रतिपादन ठाकरे यांनी यावेळी केले