
दिवाळीत मुंबईसाठी
रेल्वेला दीडशेचे वेटिंग
नालासोपारा :- दिवाळी काही दिवसांवर आली असतानाच रेल्वेच्या अनेक मार्गांवरील आरक्षण फुल्ल झाले आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासाचा अगोदरपासून बेत आखला आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटाचे वेटिंग १५० च्या पुढे गेले आहे. अनेकांनी खासगी वाहनंही बुकिंग करून ठेवली आहेत. पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी अन् कामानिमित्त बाहेरगावी असलेले अनेक लोक मूळगावी येत असल्याने दिवाळीत रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. त्यातच सर्वकाही सुरळीत सुरू झाल्याने सर्वत्र आनंद, उत्साह व समाधान दिसून येत आहे.
वेटिंग पोहाेचले १५० च्या वर
मुंबई, पुणे, हैद्राबाद व अन्य महत्त्वाच्या शहराकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट वेटिंग मिळत आहे. दिवाळीत अनेक लोक पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देतात. शिवाय मूळचे वसईचे पण कामानिमित्त बाहेरगावी असलेले लोक सणानिमित्त मुंबई, वसईत येतात. त्यानंतर परत कामाच्या ठिकाणी जातात त्यामुळे दिवाळीत रेल्वे गाड्यांचे वेटिंग वाढल्याचे दिसून येत आहे.
खासगी वाहनांकडे ओढा
रेल्वे, एसटी गाड्यांचे तिकीट मिळत नसल्याने अनेकजण खासगी वाहनाने प्रवास करण्याचे नियोजन आखत आहेत. शिवाय खासगी चारचाकी गाड्या भाड्याच्या दरात घेऊन अनेक जण पर्यटक, धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी जात आहेत. सलग सुट्ट्यांमुळे लोक आता बाहेर पडू लागले आहेत.
अशा आहेत दिवाळीत सलग सुट्ट्या
यंदा दिवाळी सण ऑक्टोबर २२ पासून सुरू होणार आहे. शनिवार २२ ऑक्टोबरला (धनत्रयोदशी), रविवार २३ ऑक्टोबर, सोमवार २४ (नरक चतुर्दशी), मंगळवार २५ (अभ्यंगस्नान), २६ ऑक्टोबर (बलिप्रतिपदा, पाडवा, भाऊबीज) हे सण एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे शनिवार ते बुधवार हे पाच दिवस शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. या सुट्ट्यांमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासाचा बेत आखला असल्याचे सांगितले.
जादा भाडे मोजावे लागणार
कोरोनाची लाट ओसरली असली, तरी रेल्वेने अजूनही विशेष गाड्या सुरूच ठेवल्या आहेत. या विशेष व डायनॅमिक फेअर असलेल्या काही स्पेशल गाड्यांमध्ये साधारण गाड्यांपेक्षा अधिक भाडे मोजावे लागते. दिवाळीत कुटुंबासह बाहेर जाणाऱ्यांना जादा भाडे मोजूनच प्रवासाला जावे लागणार आहे.
रेल्वे तिकिटाचा काळाबाजार…
रेल्वे तिकीट कन्फर्म मिळत नसल्याने प्रवाशांनी आता रेल्वेच्या तिकीट एजंटांकडे मोर्चा वळविला आहे. तिकिटापेक्षा २०० ते ३०० रुपये जास्त देऊन कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू आहे. शहरातील तिकीट एजंटांकडे प्रवासी जात असल्याचेही एकाने सांगितले.
कोट
दिवाळीच्या दिवसांत रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने प्रवाशांना जागा मिळत नाही, त्यामुळे रेल्वेतर्फे दिवाळीच्या काळात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले आहे. – रेल्वे प्रशासन