
एक हजारांचा दंड किंवा लायसेन्स होईल निलंबित !
नालासोपारा(प्रतिनिधी) :- एका दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे हा गुन्हा ठरतो. यामध्ये दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी दंडाची रक्कम कमी असल्याने ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही कमी झालेली नाही. सर्रासपणे ट्रिपल सीट प्रवास दुचाकीवरून केला जात असल्याचे चित्र अद्यापही शहरात पाहावयास मिळते. केंद्राच्या नवीन कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाताना पोलिसांच्या तावडीत सापडल्यास दुचाकीचालाकाला थेट हजार रुपये द्यावे लागणार आहेत किंवा त्या दुचाकी चालकांचे लायसेन्स निलंबित होणार आहे. यामुळे आता दुचाकीवरून ट्रिपल सीट जाताना शंभरदा विचार करावा लागणार आहे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार आता सुमारे पन्नास वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास किरकोळ म्हणून 500 रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांकडून आकारला जाणार आहे.
अनेक वेळा तरुण दुचाकी चालविताना अतिउत्साहात ट्रिपल सीट जाण्याची कसरत करतात. तर काही वेळा एकच दुचाकी घरी असल्याने संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जाण्याचा मोह काहींना आवरत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक वेळा तरुण मंडळी मित्रांसोबत जात असताना वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून ट्रिपल-चौपल सीट जात असतात. मात्र आता अशा प्रकारे वाहतुकीचे नियम तोडून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना लगाम घालण्यासाठी वसईतील अनेक मोक्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्याचे वाहतूक पोलीस अधिका-याने सांगितले.
अनेकदा वाहतूक पोलिसांना ग्राह्य धरून वसईतील रस्त्यांवर वाहतुकीचे नियम तोडले जातात. त्यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. मात्र अशा प्रकारे ट्रिपल सीट जात असताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता हे अधिक आहे. त्यामुळे सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास वाहतूक पोलीस अधिकारी करीत आहेत.
ट्रिपल सीटस्वारांवर करण्यात आलेली कारवाई……..
वर्ष केसेस वसूल करण्यात आलेला दंड
1) 2019 5497 10 लाख 72 हजार 400 रुपये
2) 2020 3895 7 लाख 79 हजार रुपये
3) 2021 (नोव्हेंबरपर्यंत) 7506 केसेस 15 लाख 1 हजार
नव्या नियमानुसार कारवाईला सुरुवात……….
नव्या नियमानुसार ट्रिपल सीट दुचाकीचालकांवर दोन दिवसांपासून कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे अद्याप तरी दखलपात्र अशी कारवाई झालेली नाही. मात्र ट्रिपल सीट दुचाकीने जाताना आढळून आल्यास वाहतूक पोलिसांकडून ई-चलानमार्फत थेट एक हजार रुपयांचा दंड किंवा लायसन्स निलंबित संबंधित वाहनचालकाकडून आकारला जात असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जाधव यांनी सांगितले.
दंड नवा, मानसिकता जुनी……….
राज्य शासनाने केंद्राचा मोटार वाहन कायदा लागू केला आहे. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता महागात पडू लागले आहे. एकीकडे दंडाची रक्कम जरी वाढली असली तरी नागरिकांच्या मानसिकतेत बदल झालेला दिसून येत नाही. यामुळे दंड नवा, मात्र ‘हम नहीं सुधरेंगे’ ही मानसिकता जुनी जैसे थे आहे, अशी चर्चा आता वाहतूक पोलिसांच्या वर्तुळातदेखील होऊ लागली आहे.
12 डिसेंबरपासून अंमलबजावणीला सुरुवात……….
नव्या मोटार वाहन कायद्यानुसार मिरा भाईंदर वसई विरार वाहतूक शाखेकडून 12 डिसेंबरपासून नव्या तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने व शिस्तीने वाहन चालविणे गरजेचे आहे, अन्यथा खिशाला मोठा भुर्दंड बसू शकतो.