

वसई (प्रतिनिधी) – विरार पूर्व भागात गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी सजा कार्यालय कार्यरत असून मोडकळीस आले असूनही त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात येत नसल्यामुळे अशा दयनीय अवस्था झालेल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत असून कामासाठी येणारे नागरिकसुद्धा सावधानता बाळगत या कार्यालयात येतात.
या कार्यालयाअंतर्गत चंदनसार, चिखल डोंगरे, नारंगी, विरार पूर्व व पश्चिम, दहिसर परिसर येत असून येथील नागरिकांची जागेच्या संदर्भातील उतारे, फेरफार, गाव नमुना, उत्पन्नाचे दाखले, तलाठी रिपोर्ट इ. कामे या तलाठी कार्यालयामार्फत होतात. मोठ्या संख्येने नागरिक या तलाठी कार्यालयात येतात. कार्यालयात जाण्यासाठी असलेले प्रवेशद्वार उंचीने कमी असून नागरिकांना वाकूनच आत जावे लागते.
कार्यालयाची अवस्था धोकादायक स्थितीत असल्याने एखादी दुर्घटना घडली तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. या कार्यालयामार्फत प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतानासुद्धा कार्यालय दुरुस्ती का होत नाही याबाबत नागरिक साशंक असून त्यांनी महसूल खात्याकडे तशी तक्रारही केली होती. परंतु परिस्थिती अद्याप जैसे थे आहे. दरवर्षी पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. छपरातून पाणी गळती होत असल्याने कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज, शासकीय कागदपत्रे जपून ठेवण्यासाठी कर्मचारी, शिपाई वर्ग यांना ताडपत्रीचा आधार घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे.
संबंधित तलाठी कार्यालयाची दुरवस्था प्रत्यक्ष पाहिल्यानंतर वसई-विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री नामदार श्री. बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची महसूलमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन महसूल विभागाच्या उपसचिवांना ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या कार्यालयाचा कायापालट होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.