
आपला देश कोरोना आजाराशी लढत आहे , देशभर लॉकडाऊन आहे. डॉक्टर्स तसेच वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि महसूल प्रशासन, महानगरपालिका कर्मचारी कोरोना आजारावर मात करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अश्या संकट समयी मागील अनेक दिवसांपासून वसईतील पाणथळ जमिनीवरील पाणथळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात तीवर तोडून अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. याबाबत आपण एप्रिल महिन्यात दोन वेळा जिल्हाधिकारी व तालुका प्रशासन यांना कळविले होते. आज गाव मौजे गिरीज, रानगाव येथील सर्व्हे नं 142 या सरकारी पाणथळ जागेवरील तिवरांची झाडे कापण्याचे कारस्थान भूमाफियांनी चालविले असल्याचे समजताच रानगावच्या जागरूक गावकर्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांनी आमच्याकडे याबाबत माहिती कळविताच त्वरित सदर जागेवर जावून तेथून वसई तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, कोंकण आयुक्त आणि दयानंद स्टॅलिन यांना सदर बाब कळविले व त्यांना प्रत्यक्ष जागेचे व्हिडिओ व फोटो पाठविले. भूमाफियांनी JCB द्वारे प्रचंड मोठ्या प्रमाणात तीवर तोडून तसेच बेकायदा उत्खनन करून पाण्याचे नैसर्गिक मार्गच बंद करून टाकले आहेत.
पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरारच्या तक्रारीनुसार वसईच्या तहसीलदारांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना जागेवर पाठवून ते अनधिकृत काम बंद करून JCB जप्त केला. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वसई पोलीस स्टेशनमध्ये JCB जमा करून JCB च्या चालकाला अटक करण्यात आली. JCB चालकाने दिलेल्या माहितीनुसार हे सरकारी पाणथळ जागेवर अनधिकृत उत्खनन करणारे जितेंद्र शंकर मेहेर व त्यांच्या साथीदारांवर वसई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत.
यावेळी पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक, मॅकेन्झी डाबरे, तसेच रानगाव चे दिपक घरत, योगेश घरत, दिपक मेहेर, पंकज घरत, श्रीरंग मेहेर आणि अनेक निसर्गप्रेमी ग्रामस्थ संपूर्ण दिवस हजर होते.


