

बविआचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विरार पश्चिम साईमंदिर परिसरातून महारॅली काढत बुधवारी शिवसेना भाजपा महायुतीने प्रदीप शर्मा यांच्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शेकडो बाईकस्वार, 2 प्रचार रथ, भगव्या साड्या परिधान केलेल्या शेकडो बाईकस्वार महिलांसह निघालेल्या महारॅलीत अभिनेते श्रेयस तळपदे, आदित्य पंचोली हे सहभागी झाले होते. ढोलताशे आणि जयघोषाच्या गर्जनांनी या वेळी वातावरण भारून टाकले होते. शिवसेनेने दिलेल्या या खुल्ल्या आवाजात शिट्टीचा आवाज कुठल्या कुठे नाहिसा झाला होता. शिट्टीचे ध्वनीप्रदूषण, भुलथापांचा गोंगाट आता पुरे झाला, आता वाघ आला वाघ आला.. अशा घोषणा देणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या महारॅलीत चैतन्य, उत्साहाची मोठी लाटच निर्माण केली होती. या महारॅलीकडे परिसरातील प्रत्येकजण, पादचारी, रहिवासी थबकून बघत होते आणि प्रतिसादही देत होते. या वेळी बदल निश्चित हीच ग्वाही प्रत्येकाची देहबोली देत होती. प्रदीप शर्मा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गेले काही दिवस धडाक्यात रॅली, जनसंपर्क, घरोघरी संवाद या माध्यमांतून प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. शर्मा प्रत्येकाशी सुसंवाद साधत विकासाचे मुद्दे मांडत असून बविआच्या दाव्यांचे पितळ उघडे पाडत आहेत. डिजिटल चव्हाट्यावरही बविआच्या खोटेपणाचे पुरावेच चित्रफितींमधून मांडले जात असल्यामुळे तोंड लपवायला बविआच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना जागा उरलेली नाही, असे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.