

पालघर(प्रतिनिधी)-पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार अमीत घोडा यांना स्वगृही आणण्यास एकनाथ शिंदे यशस्वी झाले आहेत.दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करत पालघर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान अमीत घोडा यांनी काल उमेदवारी अर्ज मागे घेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. ५ ऑक्टोबर रोजी अमित घोडा यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. प्रवेश केल्याबरोबर त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देखील जाहीर केली. मोठं शक्तीप्रदर्शन करत घोडांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतू आता त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.पालघर मतदारसंघातून शिसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे विद्यमान आमदार अमित घोडा प्रचंड नाराज होते. त्यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले होते.त्यामुळे अमित घोडा यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करत हातात घड्याळ बांधले होते.मात्र, दोन ते तीन दिवसात पुन्हा ते स्वगृही परतले. त्यामुळे पालघरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे.
लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषीत करण्यात आली होती. मात्र, लोकसभेत युती झाल्याने भाजपचा उमेदवार शिवसेनेत घेत राजेंद्र गावित यांना लोकसभेवर पाठविण्यात आले. त्यानंतर वनगा नाराज होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द विधानसभेची उमेदवारी देऊन पूर्ण केला. मात्र, यामुळे विद्यमान आमदार अमित घोडा प्रचंड नाराज झाले. त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.काल अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आमदार अमित घोडा यांचे मन वळविण्यात शिवसेनेला मोठे यश आले. राष्ट्रवादीत दाखल झालेले अमित घोडा स्वगृही परतले आहेत. त्यामुळे शिवसेनेला धक्का देणाऱ्या राष्ट्रवादीलाच धक्का बसला आहे.