नालासोपारा :- बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनचालकांचे थेट वाहन परवाने निलंबित करायला सुरवात केली आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षात तब्बल 356 वाहनचालकांचे वाहन परवाने तर 33 परमिट निलंबित केले आहेत. अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी आता बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याची वेळ आली आहे.

वाहतूकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक विभागाने कडक पावले उचलायला सुरवात केली आहे. रस्त्यांवरील वाढत्या अपघातांची संख्या कमी व्हावी, वाहने सावकाश आणि सुरक्षितपणे चालवली जावीत, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने दिली जाऊ नयेत म्हणून कारवाई मोहिम सुरू केली आहे. आत्तापर्यंत वाहतूक शाखेने गेल्या दोन वर्षांत तब्बल 356 वाहनचालकांचे वाहन परवाने तर 33 परमिट निलंबित केले आहेत. यात सिग्नलला न थांबणे, माेबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचा समावेश आहे. तर उर्वरित वाहनचालकांना नोटीस पाठवून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांचा प्रामुख्याने समावेश आहे.

यामुळे होतो वाहन परवाना निलंबित………

मोबाईलवर बोलत वाहन चालविणे. वाहनात जास्त माल भरणे (ओव्हर लोड). वाहन चालवताना वेगमर्याचे पालन न करणे. सिग्नलला न थांबता पुढे निघून जाणे. दारू पिऊन वाहन चालविणे. माल वाहतूकीच्या वाहनातून प्रवासी वाहतूक करणे.

तळीराम चालकांवर कारवाईचा बडगा……….

दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा आहे. तरीही बिनदिक्कतपणे वाहनचालक कानाडोळा करत दारू पिऊन वाहन चालवितात. यामध्ये तर काही वेळा अपघातांचाही धोका संभवतो. वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाते. त्यांच्याकडील असणाऱ्या ब्रिद अ‍ॅनलायझरने वाहन चालकाची तपासणी होते. नियम मोडणाऱ्या अशा तळीराम चालकांवर कारवाईचा बडगा वाहतूक पोलिसांकडून उचलण्यात आला आहे.

1) सन 2020 व 2021 या दोन वर्षांमध्ये सिग्नल तोडणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, भरधाव वेगात वाहने चालविणे, ड्रिंक अँड ड्राईव्ह अश्या वाहन चालकांचे 356 वाहन परवाने आणि 33 परमिट निलंबित केले आहे. अशीच कारवाई पुढे सुरू राहणार आहे. – विनोद जाधव (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, झोन 2, पोलीस आयुक्तालय)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *