
विरार : वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात ९ एप्रिल रोजी जन्मलेल्या बालिकेचा सोमवारी मृत्यू झाला.
या बालिकेला श्वसनास त्रास झाल्याने तिचे पालक तिला १६ मे रोजी डी. एम. पेटीट रुग्णालयात घेऊन गेले होते. मात्र कोरोना संशयित वाटल्याने तिथून या बालिकेला नालासोपारा येथील रिद्धिसिद्धि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या काही वेळातच या बालिकेने रिद्धिसिद्धि रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
या बालिकेच्या मृत्यू दाखल्यावर कोरोना संशयित अशी नोंद करण्यात आली असल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे.
वसई-एकचोटी येथील एका महिलेची ९ एप्रिल रोजी डी. एम. पेटीट प्रसूती झाली होती. त्यानंतर १४ एप्रिलपासून डी. एम. पेटीट रुग्णालयात काही कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडले होते. त्यामुळे काही दिवस हे रुग्णालय सील करण्यात आले होते. मात्र या रुग्णालयात उपचार घेऊन गेलेल्या रुग्णाबाबत नागरिकांनी काळजी व्यक्त केली होती.
दरम्यानच्या काळात महापालिकेने नेगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
१६ मे रोजी काही वेळ ही बालिका जे. एम. पेटीट रुग्णालयात दाखल होती; मात्र कोरोना संशयित असावी, असे वाटल्याने रुग्णालय प्रशासनाने तिला रिद्धिसिद्धि रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते.
….
या बालिकेला डी. एम. पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र कोरोना संशयित वाटल्याने आम्ही तिला रिद्धिसिद्धि हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले होते. डी. एम. पेटीट रुग्णालयात तिला अन्य रुग्णापासून लांब ठेवण्यात आले होते. रिद्धिसिद्धि रुग्णालयात बेडची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर या बालिकेला त्या ठिकाणी हलवण्यात आले होते.
–भक्ती चौधरी, वैद्यकीय अधिकारी, डी. एम. पेटीट रुग्णालय
…… तर वसई-एकचोटी भागात धारावीची पुनरावृत्ती होईल- तसनीफ़ नूर शेख
या बालिकेच्या मृत्यूनिमित्ताने पुन्हा एकदा पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाटयावर आला आहे. ही बालिका कोरोना संशयित असेल तर ती काही काळ जे. एम. पेटीट रुग्णालयात दाखल होती, हे लक्षात घ्यावे लागेल. शिवाय या आधीही या रुग्णालयात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आम्ही रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णाना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
याशिवाय या बालिकेचे कुटुंबीय राहत असलेला एकचोटी परिसर झोपडपट्टीचा आहे. या परिसरात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातील अनेक लोक राहतात. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग किंवा कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत इथे साशंकताच आहे. त्यामुळे या भागात कोरोनाचा उद्रेक झाल्यास या भागात धारावीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता या भागातील सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांनी व्यक्त केली आहे.