
पालिकेचे आरक्षण ‘बैंक्वेट हॉल’च्या पार्किंगकरता भाड़ेपट्टीवर
पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या आदेशाला केराची टोपली

प्रतिनिधी
विरार- वसई-विरार महापालिकेची आरक्षणे संरक्षित करण्याचे संकेत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिलेले असताना; पालिकेच्या विरार पश्चिम येथील ‘होल्डिंग पॉन्ड’च्या एका आरक्षणावर कब्जा झाल्याचे समोर आले आहे.
पालिकेच्या दफ्तरी हे आरक्षण वसई-विरार महापालिकेचे असल्याची नोंद असली तरी; खासगी व्यक्तीने ही जागा आपली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एका ‘बैंक्वेट हॉल’च्या पार्किंगकरता भाड़ेपट्टीने दिलेली ही जागा नेमकी कुणाची? या संभ्रमात परिसरातील रहिवाशी आहेत.
विरार पश्चिम येथील गोकुळ टाउनशिप येथे सर्व्हे क्रमांक-४०१ ही मोकळी जागा आहे. या जागेच्या ७/१२वर सदरहू १.५७ क्षेत्र जागा ग्रामपंचायत बोलिंज असा स्पष्ट उल्लेख आहे.
तत्कालीन बोलिंज ग्रामपंचायतीकडे असलेली ही जागा पालिका निर्मितीनंतर वसई-विरार महापालिकेकडे वर्ग करण्यात आलेली आहे. पालिकेने ही जागा ‘होल्डिंग पॉन्ड’करता आरक्षित केलेली असल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे पालिकेच्या ताब्यात असलेल्या या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात माती भराव करण्यात आला आहे. परिणामी या भागात एकवटणारे पाणी माती भरावामुळे परिसरात पसरुन आजूबाजूच्या इमारती पाण्याखाली येण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे माती भराव करून समतल करण्यात आलेल्या या जागेवर हैलोज़न रोषणाई व्यवस्था करून मागील चार वर्षांपासून बालाजी बैंक्वेट हॉलला भाड़ेपट्टीवर पार्किंगकरता देण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
ही जागा भाड़ेतत्त्वावर देण्याकरता संबंधित खासगी व्यक्तिने कोणताही करारनामा केलेला नाही. अंतर्गत सामंजस्यातून हा व्यवहार असल्याचे या खासगी व्यक्तीचे म्हणणे आहे. पालिकेच्या मते; ही आरक्षित जागा ४०१ अशी आहे; तर खासगी व्यक्तिच्या मते ही जागा सर्व्हे क्रमांक १७६/२ अशी असून; या जागेचा आपण सर्व्हेही केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान; या जागेवर झालेल्या अनधिकृत माती भराव व बेकायदा पार्किंगबाबत परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. तर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी १७ नोव्हेबर रोजी घेतलेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीदरम्यान प्रसारमाध्यमांसोबत बोलताना पालिकेची आरक्षणे संरक्षित करण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले होते.
पालकमंत्री यांच्या बैठकीला आठ दिवस लोटत नाही; तोच पालिकेचे आरक्षण भाड़ेपट्टीने पार्किंगकरता दिल्याचे उघड़ झाल्याने पालिकेच्या आरक्षणांच्या धोरणाबाबत नागरिकांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रतिक्रियेकरता त्यांचे स्वीय सहाय्यक दीपक पाटील यांच्याशी संपर्क केला असता; त्यांनी फोन उचलला नाही.
सदरहू जागा पालिकेची आहे. या जागेवर अतिक्रमण झाले असेल तर पाहणी करण्यात येईल. व संबंधित व्यक्तिवर कारवाई करण्यात येईल.
–प्रदीप पाचंगे, सहाय्यक अभियंता, वसई-विरार महापालिका
ही जागा आम्हाला अनिल म्हात्रे यांनी भाड़ेपट्टीवर दिलेली आहे. प्रत्येक लग्न सोहळ्यानुसार आम्ही त्यांना भाड़े अदा करतो. याबाबत काही करारनामा झालेला नाही.
–मनोज नेवरेकर, व्यवस्थापक, बालाजी बैंक्वेट हॉल
सदरहू जागेचा ७/१२ हा १७६/२ असा आहे. या जागेचा आम्ही सर्व्हेही केलेला आहे. पालिकेने विचारणा केल्यास आम्ही कागदपत्रेही सादर करू. ही जागा आम्ही बालाजी बैंक्वेट हॉलला पार्किंग करता भाड्याने दिली असली तरी त्याकरता करार केलेला नाही. हा सामंजस्यातून व्यवहार झालेला आहे.
–अनिल म्हात्रे, जागा कब्जेदार
मी कमानिमित्त मंत्रालयात आहे. उद्या या संदर्भात माहिती घेऊन आपल्याला कळवतो.
–राजेंद्र लाड़, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका