
कोळीवाडा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात ?
प्रतिनिधी
वसई : वसई-कोळीवाडा येथील स्मशानभूमीतील कचरा काही समाजकंटक येथील काही घरांच्या मागे आणून टाक़त असल्याचे उघड झाले आहे. समाजकंटकांच्या या हरकतींमुळे येथील गरीब कुटुंबांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.
वसई-विरार महापालिका ‘स्वच्छ भारत अभियान’ शहरात राबवत असल्याची दवंडी पिटत असली तरी अनेक वेळा महापालिकेची पोलखोल झाली आहे. नुकतीच नवनियुक्त आयुक्त गंगाथरन डी. यांनी काही आरोग्य निरीक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या कामात हलगर्जी केली म्हणून त्यांचे निलंबन करून महापालिकेच्या ‘स्वच्छ्ता अभियान’ कसे चालते हे उघड केले आहे.
आगामी पावसाळा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता आवश्यक असताना आता वसई-कोळीवाडा येथून मात्र धक्कादायक बातमी पुढे आली आहे.
येथील स्मशानभूमीतून निघणारा कचरा काही समाजकंटक येथीलच काही नागरिकांच्या घराशेजारी आणून टाकत आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. मात्र याबाबतची दाद मागायची कुणाकड़े, असा प्रश्न या गरीब कुटुंबांसमोर आहे.
या कचऱ्याच्यां आडोशाला काही जनावरे व व्यसनी लोक येऊन बसत असल्याने येथील कुटुंबांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.