
पालघर दि. 12 : फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 (C) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पालघर जिल्हयातील 1) काळमांढवी धबधबा, केळीचा पाडा, ता.जव्हार, 2) हिरडपाडा धबधबा, ता.जव्हार, 3) दाभोसा धबधबा, ता.जव्हार, 4) डोम विहीरा खडखड धरण, ता.जव्हार, 5) पळूचा धबधबा, साखरा, ता.विक्रमगड, 6) वाघोबा खिंड धबधबा, ता.पालघर, 7) एैना दाभोण धबधबा, बोईसर, 8) पडघा, बोईसर धबधबा, 9) देवखोप धरण, पालघर, 10) तांदुळवाडी धबधबा, सफाळा, ता.पालघर, 11) झांझरोळी धरण, केळवा रोड पुर्व, ता.पालघर, 12) चिंचोटी धबधबा, वसई, 13) तुंगारेश्वर धबधबा, वसई, 14) वांद्री धरण, गांजे ढेकाळे, ता.पालघर, 15) तिळमाळचा धबधबा, वडपाडा परळी, ता.वाडा या ठिकाणी असलेले धबधबे, तलाव किंवा धरणे या ठिकाणांच्या सभोवताली 1 किलोमीटर परीसरात दि.10 जूलै 2019 ते दि.06 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये खालील बाबींसाठी मनाई आदेश लागू करण्यात येत असल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
- पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
- धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
- पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे .
- पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.
- वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे.
- वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतूकीस परिणाम होईल अशा प्रकारे वाहने चालविणे.
- वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादाय स्थितीत ओव्हरटेक करणे.
- सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्य उघडयावर इतरत्र फेकणे.
- सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
- सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डि.जे. सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.
- ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.
- धबधब्याचे 1 कि.मी. परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)
सदरच्या मनाई आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (b) नुसार कारवाई करण्यात येईल.
सदरचा मनाई आदेश आदेशातील उक्त नमुद ठिकाणी व्यक्ती/संस्था इ. यांचेकडून चित्रिकरण, सामाजिक उपक्रम/ कार्यक्रम इत्यादिंसाठी संबंधित विभागाकडून पुर्व परवानगी घेतलेल्या कार्यक्रमांना लागू असणार नाहीत.