

नालासोपारा : प्रतिनिधी
वसई-विरार महापालिका हद्दीतील नवघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सरकारी जागेवर अतिक्रमण झाल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांनी जागेची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिसरात नव्याने वादाला तोंड फुटले आहे.
नवघर येथील सर्वे क्रमांक ५८ मधील सुमारे ६०.७० गुंठे जागा ही जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर यांच्या नावे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नोंद आहे. या जागेवर नव्या इमारतीसाठी प्रस्तावित आराखडा मंजूर झाला असला, तरी प्रत्यक्षात संपूर्ण जागा ताब्यात नसल्याचा मुद्दा पुढे आला आहे. सातबारा उताऱ्यात नमूद असलेल्या क्षेत्रफळाव्यतिरिक्त काही भागावर अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
यासंदर्भात वसई-विरार शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुलदीप दिनेश वर्तक यांनी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर यांच्या नावे असलेली ही जागा कायमस्वरूपी हद्द निश्चित करून मोकळी करण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या माध्यमातून येथे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू असल्याने, प्रथम जागेची अचूक मोजणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या शासकीय जागेच्या काही भागाचा वापर एका विकासकाने इमारतीला जाणाऱ्या रस्त्यासाठी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता खरेदी केल्याचा दावा करत संबंधित विकासकाने खरेदीखत तयार केले असल्याची तक्रार यापूर्वी महसूल विभागाकडे करण्यात आली होती. मात्र या प्रकरणातील कारवाई अद्याप प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, यापूर्वी करण्यात आलेली मोजणी ही थातूरमातूर पद्धतीने झाल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला आहे.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मारड यांनी सांगितले की, “सदर जागेची मोजणी जुलै २०२५ मध्ये करण्यात आली होती व त्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार नव्या रुग्णालयाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. मात्र दाखल झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी, वसई यांनी पुर्नमोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत.”
या संदर्भात भूमी अभिलेख विभाग, वसई यांना लवकरच पत्र पाठवून पुन्हा मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुर्नमोजणीनंतर जागेवरील अतिक्रमणाबाबतचे वास्तव समोर येण्याची शक्यता असून, त्यानुसार प्रशासनाकडून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
civil surgeon palghar 24 Feb 2026
