
प्रतिनिधी – दि.१३ सप्टेंबर २०२२ रोजी नशाबंदी कार्यालयात मैत्री संस्थेच्या सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण अंतर्गत संस्था भेट कार्यक्रमात मुंबई विभागातील सक्रिय अनुभवी ३० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी भेट दिली.यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रुपचंद पाटील यांनी नशाबंदी मंडळाची ओळख आणि कामकाजाची माहिती दिली.यावेळी मिलिंद पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी व्यसन हा मानसिक आजार आहे आणि तो बरा होऊ शकतो.नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेल्या ६४ वर्षांपासून कार्यरत असून ते व्यसनाविरोधी प्रचार,प्रसार प्रबोधन करीत आहेत.मंडळाचे मुख्य ध्येय मतपरिवर्तनातून व्यसनमुक्ती समाज निर्माण करणे हा आहे.आपण ज्यावेळी एक किंवा अनेक व्यसनांच्या आहारी जातो तेव्हा एकापेक्षा अनेक संकटांना सामोरे जात असतो.व्यसनामुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.दारु , तंबाखू, गुटखा, सिगारेट या मादक द्रव्यांचे व्यसन समाजामध्ये फोफावत आहे.यामुळे कर्करोग, फुफ्फुसाचे ,व तोंडाचे आजार, असह्य खोकला, बुद्धी भ्रष्ट होऊन मेंदूचे कार्य मंदावणे,हार्ट ऍटकची शक्यता वाढते ,रक्ताशय होणे , शरीर मन कमकुवत होणे हे आजार शरीराला एकूणच पोखरुन माणसाला मृत्युच्या दारात कधी नेऊन ठेवतो हे कळत सुद्धा नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०२० ते २०३० पर्यंत जगातील सुमारे १०० कोटी लोक तंबाखूच्या रोगामुळे मृत्यू पावतील . त्यामध्ये २० ते ३० वयोगटातील ४०%लोक असू शकतील.असे मत वर्तविले आहे.व्यसनाच्या प्रकार व प्रमाणावर रुग्णांचे उपचार अवलंबून असतात.आपण उपचार घेऊन निर्व्यसनी व्हावे व इतरांना निर्व्यसनी करण्याकरिता नशाबंदी मंडळाच्या संकल्पात सामील व्हा असे आवाहनही यावेळी मिलिंद पाटील यांनी केले.यावेळी प्रशिक्षणार्थीनी व्यसनमुक्तीच्या या कार्यात आम्ही जोडून घेऊ आणि स्वतः निर्व्यसनी राहू असा संकल्प सर्वांनी केला.या संस्था भेट कार्यक्रमात सूत्रसंचालन सचिव राजेश जाधव यांनी केले तर अध्यक्ष सूरज भोईर यांनी व्यसनमुक्ती वर प्रबोधनपर गीते गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.