शिष्टमंडळाची आयुक्तांसोबत बैठक

विरार : नागरी समस्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा आक्रमकझाली आहे. वसई-विरार शहरातील अनधिकृत फेरीवाले, प्रलंबित जलजोडणी आणि विविध विकासकामांच्या अनुषंगाने जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसेना शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी (28 जून) आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली आणि या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक भागांत अतिक्रमण करून फेरीवाले आपले बस्तान मांडत आहेत. पदपथ, रस्ते अडवून फेरीवाले बसत असल्याने पादचाऱ्यांना पदपथ व रस्त्यावरून चालणे मुश्कील होते. तसेच व्यापारी दुकानांनाही या सगळ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीही होते.

‘ना फेरीवाला क्षेत्रा`त फेरीवाल्यांनी व्यवसाय करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. रेल्वे स्थानक, उड्डाणपूल व पादचारी पुलाच्या 150 मीटर; तर धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था व रुग्णालयांच्या 100 मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केलेली आहे. विशेष म्हणजे फेरीवाल्यांना ते व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी रात्री त्यांचे सामान, साहित्य ठेवता येणार नाही. त्याचबरोबर फेरीवाल्यांनी कुठे व्यवसाय करायचा या संदर्भातील नियम फेरीवाला धोरणानुसार ठरतील, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानेही दिलेले आहे. मात्र हे सर्व आदेश धाब्यावर बसवून वसई-विरार शहरात फेरीवाल्यांनी बाजार मांडलेला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना तात्काळ हटविण्यात यावे व जनसामान्यांचा मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली.

तसेच; वाढीव पाणी उपलब्ध झाल्याने नवीन नळ जोडणी मंजूर करण्यात येत असल्याची माहिती 2022-23च्या या अर्थसंकल्पातून पालिकेने दिली होती. प्रत्यक्षात 2020 पासून आजपर्यंत ही प्रक्रिया बंद असल्याने 12,199 इतक्या नळजोडणी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या नळजोडणी लवकरात लवकर देण्यात याव्यात आणि वसई-विरारकरांची तहान भागवावी, अशी मागणीही शिवसेनेने या प्रसंगी केली आहे. याशिवाय वसई पूर्व येथील दृककला महाविद्यालयाशेजारी साचणाऱ्या पावसाळी पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी महापालिकेने ‘बॉक्स कल्व्हर्ट`चे काम प्रस्तावित केले होते. मात्र या कामाला अद्याप गती मिळालेली नाही, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे हे काम जलदगतीने सुरू करून पूरस्थितीपासून वसई-विरारकरांना दिलासा द्यावा, अशी विनंतही या प्रसंगी करण्यात आली.

दरम्यान; नालेसफाई, गटारे, रस्त्यात पडलेले खड्डे, विद्युत पोल, चेंबरवरील झाकणे व त्या अनुषंगिक विकासकामे या दृष्टीने सामान्य वसई-विरारकरांकडून नेहमी मागणी होत असते. या कामांचीही पालिका स्तरावरून लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी. त्यासाठी त्यांना ताटकळत ठेवू नये, अशी आग्रही मागणीदेखील या वेळी करण्यात आली. विशेष म्हणजे; या कामांबाबत पालिका सकारात्मक आहे. सामान्यांच्या या अडचणी लवकरात लवकर सोडविल्या जातील, असे आश्वासन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिले आहे. शिवसेनेच्या या शिष्टमंडळात शिवसेना माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, नालासोपारा विधानसभा संघटक जनार्दन पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, किशोर पाटील, शहरप्रमुख प्रदीप सावंत, संजय गुरव, उदय जाधव, आनंद चोरगे, युवा सेना अध्यक्ष सिद्धेश जोगळे, सुनील मिश्रा वउपशहर प्रमुख शशीभूषण शर्मा आदी मान्यवरांचा समावेश होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *