

वसई :(प्रतिनिधी )
नायगाव खाडीवरील बंद करण्यात आलेला जुना लोखंडी पूल, नवीन पुलावरील नागरीकांसाठी त्रासदायक ठरणारे लोखंडी जीने व नविन पुलाचे कासवगतीने सुरू असलेले काम यामुळे नायगाव पुर्व वासियांची होणारी गैरसोय लक्षात घेता बहुजन विकास आघाडी, युवा शिष्टमंडळाने पी.डब्लु.डी. मुख्य अभियंता किरण बडे यांची पालघर मुख्य कार्यालयात जाऊन आज भेट घेतली. तसेच सोपारा खाडीवरील पुलावरील समस्या व कामाच्या वेगाबाबत सविस्तर चर्चा केली.
सप्टेंबर २०१८ मध्ये नायगाव खाडीवरील नविन पूल लोखंडी जीने लाऊन तात्पुरत्या स्वरूपात नागरीकांसाठी खुला करण्यात आला. परंतु सदर पायऱ्या नागरीकांसाठी व विशेषत: वयोवद्ध, गरोदर महिला, अपंग नागरीकांसाठी गैरसोयीच्या ठरत आहेत. अशातच पहिल्याच पावसात पुलावर पाणी साचणे, कॉक्रीटचे खड्डे-नादुरूस्ती, पुलावर दिसणाऱ्या सळ्या, पुलाचे संथगतीने सुरू असलेले बांधकाम व या सर्वांमुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणावर होत असलेली गैरसोय लक्षात घेता शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
पी.डब्लु.डी. प्रशासनामार्फत मागील ०५ वर्षापासून कासवगतीने सुरू असलेले नायगाव सोपारा खाडीवरील नविन पुलाच्या बांधकामाबाबत जनतेमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. याकामी मागील ४.५ वर्षापासून सातत्याने रितसर पाठपुरावा सुरू आहे.
नायगाव पुर्व पश्चिम उड्डाणपूलामुळे खाडी पुलाच्या संरचनेत झालेला बदल व त्यामुळे वाढीव कामासाठी लागणारा अतिरीक्त निधी रू.1,01,74,000/- वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत पी.डब्लु.डी. प्रशासनाकरीता राखून ठेवण्यात आलेला आहे. सदर निधीतील रू.२० लक्ष रक्कमेचा निधी पी.डब्लु.डी. प्रशासनास वर्ग करण्यात आलेला असून त्याव्दारे पुलाच्या उतार मार्गाच्या कामाचे भूमीपुजन दि.०९ सप्टेंबर २०१८ रोजी करण्यात आले होते. परंतु पी.डब्लु.डी. मार्फत नविन पुलाचे काम पुर्ण करण्याच्या तारखा व आश्वासनाशिवाय नायगाव वासियांच्या हाती काहीच पडलेले नाही. सदर कामी विविध मार्गाने शासनाकडे लक्ष वेधण्यात आलेले आहे.
सद्यस्थितीत पुलाच्या पुर्वेकडील भागाचे उतार मार्गाची टो-वॉल, साईड वॉल व माती भरावाचे काम प्रगतीपथावर आहेत. परंतु सदर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. तसेच पावसामुळे पुलावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा, खड्डे, दर्शनी सळ्या इत्यादींची दुरूस्ती व महानगरपालिकेमार्फत पुलावरील पाणी निचऱ्याची तात्पुरती सोय लक्षात घेता याकामी कायमस्वरूपी उपाययोजना करणेबाबत शिष्टमंडळाने निवेदनाव्दारे यावेळी विनंती कली.
पी.डब्लु.डी. मुख्य अभियंता किरण बडे यांनी उर्वरित निधी उपलब्धतेसाठी मनपाकडे विनंती केली आहे. जेणेकरून पुलाच्या पुढील उर्वरित कामांना गती देणे शक्य होईल. तसेच नायगाव सोपारा खाडीवरील पुलाचे काम लवकरात लवकर पुर्ण करणेबाबत समस्त नायगाव वासियांमार्फत पी.डब्लु.डी. प्रशासनास यावेळी विनंती करण्यात आली आहे.