
इमारतीच्या तीन घरांमध्ये थाटला होता अनधिकृत बार
नालासोपारा :- नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरातील एका इमारतीच्या तीन घरामध्ये नायजेरियन नागरिकांनी अनधिकृतपणे बार थाटल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तुळींज पोलिसांनी एसआरपी कर्मचाऱ्यांच्या मदतीने चार टीम बनवून गुरुवारी रात्री धाड मारली. या ठिकाणाहुन हजारो रुपयांच्या दारुसह ३ महिला आणि २ पुरुष असे ५ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरमधील नूर अपार्टमेंट या इमारतीमधील तीन सदनिकांमध्ये काही निग्रोनी अनधिकृतपणे बार थाटल्याची गुप्त माहिती तुळींजचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना खबऱ्याने गुरुवारी दिली होती. यानंतर एसआरपीचे प्लाटून आणि तुळींज पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या टीम बनवून सदर ठिकाणी धाड टाकण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुळींज पोलिसांनी महिला पोलीस कर्मचारी आणि आरसीपी प्लाटून असा मोठा पोलीस फौजफाटा घेऊन गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रगती नगर परिसरात पोहचले. माहिती मिळाल्याप्रमाणे इमारतींमध्ये तीन रूममध्ये आलिशान अनधिकृत बार थाटलेले होते. पोलिसांच्या टीमने घातलेल्या धाडीमध्ये आरोपी महिला इमोखाई टोनिया (५०), देबोरहा अलाईस (३१), गेनी ओमारी (३८), ओकोफ़ॉर इबिरी आणि न्नमिदी ऍनाचुनम (३०) या ५ स्त्री पुरुष नायजेरियन नागरिकांना घटनास्थळावरून अटक केले आहे. या अनधिकृत बारमधून विविध कंपनीच्या बियर, व्हिस्की, वाईन असा ५९ हजार ९३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नायजेरियन नागरिकांचा अड्डा
तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रगती नगर परिसरात अंदाजे हजारो नायजेरियन लोक राहत असून त्यांचा याठिकाणी अड्डा झाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. पोलीस प्रशासन यांच्यावर वेळीच कारवाई करत नसल्यामुळे यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असल्याचीही चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होत आहे. जर वेळीच नायजेरियन यांच्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर भविष्यात हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतील.
कोट
सदर ठिकाणी नायजेरियन अनधिकृतपणे बार चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा घेऊन जात सदर ठिकाणी धाड मारली आहे. या ठिकाणाहून दारू साठा जप्त करण्यात आला आहे. – राजेंद्र कांबळे (पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)