

शिवसेनेचा भगवा पालघरवर जसा डौलाने फडकतो आहे त्याच डौलाने आता आपल्याला तो नालासोपारावर फडकवायचा आहे. इथल्या झुंजीची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मला खात्री आहे ही कामगिरी तुम्ही फत्ते करालच. तुमचा विजय आजच घोषित करायला हरकत नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी प्रदीप शर्मा यांना शुभेच्छा दिल्या. नालासोपाऱ्यातील लढतीत लोकांच्या बाजूने उतरलेल्या शर्मा यांच्या शिवनेरी 132 या नियंत्रण कार्यालय आणि वॉर रूमचे उद्घाटन फाटक यांच्या हस्ते आज करण्यात आले. आता ही माझी कंट्रोल रूम आहे. इथे जे चोर असतील त्यांना पकडण्यात येईल, अशी आव्हानात्मक भाषा करत प्रदीप शर्मा यांनी खळबळ उडवून दिली.
नालासोपारा (पूर्व) भागातील फायर ब्रिगेडसमोर गॅलक्सी हॉटेलशेजारी हे कार्यालय आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, जिल्हा उपप्रमुख नवीन दुबे, आगरी सेनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन तथा जन्यामामा पाटील, वसई जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हाप्रळकर, माजी जिल्हाध्यक्ष शिरीष चव्हाण, नगरसेवक स्वप्नील बांदेकर, शिवसेनेचे इतर पदाधिकारी, महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. या उद्घाटनाच्या निमित्ताने सर्व परिसर झेंडे, पताका यांनी भगवा झाला होता. दीर्घ काळाने येथे टफ फाईट होणार असल्याने सर्व शिवसैनिकांत झुंजण्याची ईर्षा जागवली गेली आहे.
जेव्हा कार्यालयाच्या उद्घाटनालाच एवढी गर्दी झाली तर, विजयाला किती असेल, असा प्रश्न विचारत फाटक यांनी शिवसैनिकांना आणखी चेतवले. आता तुम्ही प्रचार सुरू करा. अगदी घराघरांत जाऊन करा. हवा झालीच आहे. आता काम करून विजय खेचून आणू, बदल घडवू, असे त्यांनी सांगितले.
आमचे मोठे भाऊ सर्व हिशोब चुकता करायला आले आहेत. ते जाण्यासाठी नाहीत तर भ्रष्टाचाऱ्यांना घालवण्यासाठी आले आहेत. रस्त्यांवर पाणी आणि नळाला पाणी नाही हे चित्र तेच बदलतील. आम्ही सर्व त्यांच्याबरोबरच आहोत, असे जिल्हा उपप्रमुख नवीन दुबे यांनी आवेशपूर्ण भाषणात त्यांनी सांगितले.
हा नियंत्रण कक्ष आणि वॉर रूम येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडींचे एक केंद्र बनणार आहे. विजयाची तुतारी इथूनच फुंकली जाईल, अशी भावना वसंत चव्हाण व इतरांनी व्यक्त केली.
मी केवळ निवडणुकीपुरता नाही – प्रदीप शर्मा
मी केवळ निवडणुकीपुरता येथे आलेलो नाही. आता येथेच असीन आणि लोकांमध्ये राहीन. माझी कंट्रोल रूम सदैव जनतेसाठी खुली असेल. नवीन, सुंदर विरार नालासोपारा मी तुम्हाला देणार हा माझा शब्द आहे. इथल्या पक्षाने, नेत्यांनी इतकी वर्षे तुम्हाला फसवलं, लाथाडलं, रडवलं!! आताही विकासाच्या भुलथापा सुरू झाल्या आहेत. भूमीपूजनांचा धडाका लावलाय, कामांचा पत्ता नाही. यांच्यावर विसंबाल तर पुढच्या वर्षीही घरदारं पाण्यातच जातील. बदल घडवा, मला संधी द्या, असे आवाहन प्रदीप शर्मा यांनी या वेळी केले. जिल्ह्यातील सहाही आमदार निवडून आणू, विकास घडवू, असेही ते म्हणाले.