
राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने महानगरपालिकेला दिले निवेदन
नालासोपारा (प्रतिनिधी) : मौजे गास सर्वे नंबर ४११ वसई तालुक्यातील हनुमान नगर नालासोपारा पश्चिम येथे अनेक इमारती गेल्या पंधरा वर्षापासून अस्तित्वात आहेत. या सर्व इमारतीतील नागरिक वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नागरी सुविधेपासून वंचित आहेत. या विभागातील सर्व नागरिक आप आपल्या मालमत्तेचा आपल्या मालकीचे नावे असलेल्या मालमत्ता कर प्रामाणिक पणे वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात भरणा करीत आहेत. परंतु आजतागायत या परिसरात रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे सदरच्या परिसरात नागरिकांना वहिवाट ये – जा करताना फार गैरसोय होत आहे. या परिसरात दोन कच्चे रस्ते आहेत त्यांची लांबी अंदाजे १५०० फूट आहे व रुंदी ३० फूट आहे. सदर परिसरात अनेक इमारती आहेत़ जसे स्टार आँचित अपार्टमेंट, साईकृपा अपार्टमेंट, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, स्वस्तिक अपार्टमेंट, विशाल अपार्टमेंट, सिद्धेश अपार्टमेंट शिवप्रभू अपार्टमेंट, सिल्वर प्लाझा अपार्टमेंट, साई सावली अपार्टमेंट, बालाजी अपार्टमेंट, ओम साई अपार्टमेंट, केडीचम अपार्टमेंट, जय भवानी अपार्टमेंट, वास्तूव अपार्टमेंट, नवदुर्गा अपार्टमेंट, दर्शना अपार्टमेंट, नवलादेवी अपार्टमेंट, गुरुकृपा, डायमंड प्लाझा अपार्टमेंट, डेल्टा अपार्टमेंट यापेक्षा अधिक इमारती सदर ठिकाणी आहेत. सदर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या गंभीर समस्या लक्षात घेता राष्ट्रीय पँथर्स आघाडीतील वसई जिल्हा कार्यकारणी यांच्या वतीने प्रभाग समिती-ई नालासोपारा पश्चिम महानगरपालिका कार्यालयात निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देण्यासाठी वसई जिल्हा सचिव विजय एस. राजभर, खजिनदार राजू श्रीवास्तव, सहसचिव रामेश्वरी राठोड, नालासोपारा शहर उपाध्यक्ष जेम्स अलेगेरी व उस्मान अली, मारिया अलेगेरी असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.