
निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी ११ ते ०३ या कालावधीत अक्षरशः थैमान घातले आहे .वाऱ्याच्या तुफान वेग व जोरदार पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली .कौलारू घरांची सर्वत्र छते ,पत्रे , शेतीतील केळी , सुपारी , नारळ सर्व काही नष्ट झाली आहेत .श्रीवर्धन तालुका वादळाचा केंद्र बिंदू असावा असे वाटते .श्रीवर्धन शहरातील सर्व पाखाडी ,आळी तील रस्त्यावर झाडे आडवी पडली आहेत .प्रत्येक पाखडीतील लोकांनी स्वतः आपापल्या पाखडीतील रस्त्यावर आलेली झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे .पाऊस व वारे यामुळे सर्व शेतीतील उभी पिके नष्ट झाली आहेत .विद्युत महामंडळाची सर्व पोल आडवे पडले आहेत .त्या कारणे विद्युत पुरवठा अनिश्चित कालावधीसाठी खंडित झाला आहे .अनेक लोकांना शाळा व सरकारी कार्यलायत स्थलांतरित करण्यात आले आहे .निर्वासित लोकांना शासकीय यंत्रणे मार्फत अन्न पुरवठा केला जात आहे . श्रीवर्धन शहरातील सर्व नगरपालिका शाळा , एस टी स्थानक येथे स्थलांतरित लोकांना आसरा देण्यात आला आहे . शहरातील धोकादायक असलेल्या धोंड गल्ली , मेंटकर्णी , जीवना कोळीवाडा येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे . श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .चक्रीवादळाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे .माती व विटांच्या घरात पाणी साचले आहे .त्यामुळे चक्रीवादळाने ग्रस्त झालेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा F करावी लागली आहे .वादळा नंतर प्रांताधिकारी अमित शेडगे , तहसीलदार सचिन गोसावी व मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांनी वादळाच्या नंतर तात्काळ शहरातील सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे .