वसई : (प्रतिनिधी) : वसई पंचायत समितीच्या 8 गण आणि जिल्हा परिषदेच्या 4 गटांसाठी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याकडे लक्ष लागून राहीलेल्या वसईकरांसमोर निवडणूक मैदानातील अंतीम चेहरे अखेर समोर आले असून लवकरच सर्वपक्षीयांकडून प्रचाराचा नारळ फुटणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतीम दिवशी युती किंवा आघाडीसारखी काही समिकरणे जुळून येतात का ते पाहणे रंजक ठरले होते. मात्र बहुजन विकास आघाडी व शिवसेना दोन्ही पक्ष स्वबळावर मैदानात उतरले असून त्यांच्यातच महामुकाबला रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. एकुण 8 गण आणि 4 गटांसाठी होत असलेल्या निवडणुकांत पक्षीय बळाबळ पाहता बहुजन विकास आघाडी आणि त्यांच्यासमोर शिवसेना पक्षाला घाम गाळावा लागणार आहे. वसईच्या मेढे, तिल्हेर, चंद्रपाडा, भाताणे, वासळई, अर्नाळा किल्ला, कळंब आणि अर्नाळा या 8 गणांमधील दोन्ही पक्षांसोबत इतरही पक्षांचे उमेदवार रणांगणात उतरले आहेत. तर तिल्हेर, भाताणे, कळंब, अर्नाळा या 4 जिल्हा परिषद गटांतील निवडणूक मैदानातील चेहरे समोर आले आहेत.
अत्यंत प्रतिष्ठेच्या वसई पंचायत समिती निवडणुकीत अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उडी घेतली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी अंतीम काही चेहर्‍यांवर मोहोर उमटवून त्यांना मैदानात उतरवले आहे. वसई तालुक्यातील आठ गणांपैकी तिल्हेर, चंद्रपाडा, भाताणे, मेढे, वासळई, कळंब, अर्नाळा, अर्नाळा किल्ला या 8 गणांमध्ये तर भाताणे, तिल्हेर, अर्नाळा, कळंब या चार गटांमध्ये बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच महामुकाबला रंगणार आहे. यंदा गण आणि गटासाठी आरक्षण बदलल्याने नव्या उमेदवारांना संधी मिळाली आहे. त्यामुळे साहजिकच बविआ, शिवसेना आणि इतर घटकपक्षांमधील नवे चेहरे मतदारांना प्रचारात दिसतील. यातील महत्वाच्या काही लढतींना प्रतिष्ठा प्राप्त झाली असून समस्त वसईचे लक्ष या निवडणुकांकडे असणार आहे हे वेगळे सांगायला नको.

प्रतिष्ठेच्या लढती
तिल्हेर गणातून याआधी पंचायत समितीवर निवडून गेलेले श्रमजीवी संघटना, शिवसेना, जनआंदोलन समितीचे सुरेश रेंजड हे आता तिल्हेर गटातून नशीब आजमावत आहेत. त्यांना बहुजन विकास आघाडीचे किसना माळी यांचे तगडे आव्हान असणार आहे. तर भाताणे गटातून श्रमजीवी संघटना-शिवसेनेकडून गणेश उंबरसाडा हे मैदानात उतरले आहेत. याठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या प्रतिष्ठीत उमेदवाराचे गणेश उंबरसाडांसमोर आव्हान असणार आहे. मेढे गणातून बहुजन विकास आघाडीचे रूपेश वसंत पाटील हे मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रूपेश वामन पाटील हे मैदानात उतरले आहेत. याशिवाय कळंब आणि अर्नाळा या दोन बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या लढतींकडे वसईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.

सख्खे मावसभाऊ एकमेकांविरोधात
शिरवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रूपेश वामन पाटील हे शिवसेनेकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत तर त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीने त्यांचेच सख्खे मावसभाऊ व आडणे-भिनार ग्रामपंचायतीचे उपसरपंच रूपेश वसंत पाटील यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे दोन मावसभावांमधील या लढतीकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *