वसई : कोणत्याही राजकीय पक्षाचा जमीनीवर काम करणारा कार्यकर्ता व पदाधिकारी हा त्या पक्षाचा कणा असतो. पक्षाची विचारधारा, धोरणे व कार्यक्रम घराघरात पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य तो करीत असतो. विविध सामाजिक व नागरी समस्यांबाबत स्थानिक प्रशासनाशी पत्रव्यवहार करणे, आंदोलने करणे आणि नागरिकांच्या समस्या सोडवून पक्षाची प्रतिमा उंचावणे ही त्याची जबाबदारी असते. मात्र, अशाच जमीनीवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले, योग्य नेतृत्व व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्यास तो कार्यकर्ता हताश होऊन पक्ष सोडण्यास मजबूर होतो।
कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची जितकी जबाबदारी पक्षाप्रती असते, तितकीच जबाबदारी तो ज्या शहरात कार्य करतो त्या नागरिकांप्रतीही असते. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्या मांडणे, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, शासन–प्रशासनाविरोधात आंदोलन करणे, निवडणुकीत पक्षाच्या बाजूने मतदान घडवून आणणे – ही सर्व जबाबदारी तो प्रामाणिकपणे पार पाडत असतो. मात्र, अशा जुझारू व निष्ठावान कार्यकर्त्याची सातत्याने उपेक्षा झाली, तर तो कार्यकर्ता अखेर पक्षत्यागाचा निर्णय घेतो ।
असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात घडल्याचे पाहायला मिळत आहे. वसई–विरार शहर जिल्हा मीडिया प्रमुख कमर बेग यांनी बुधवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.
मार्च २०२४ मध्ये माननीय शरद पवार साहेब यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन कमर बेग यांनी प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला होता. मागील १५ वर्षांपासून सक्रिय पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेल्या कमर बेग यांनी वसई–विरारमधील नागरिक समस्या व मूलभूत सुविधांबाबत सातत्याने पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवला होता.
आरटीआयच्या माध्यमातून वसई–विरार शहराच्या विकासाशी संबंधित अनेक मोठ्या प्रकल्पांचे काम न झाल्याचे त्यांनी उघड केले होते. आयआयटी मुंबई व नीरी यांच्या जलभराव सर्वेक्षणासाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च करूनही उपाययोजना न राबवणे, प्रस्तावित मनपा मुख्यालय न उभारणे, ७ वर्षांनंतरही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम अपूर्ण असणे, नालासोपारा–विरार लिंक रोडवरील फुटपाथ व जॉगिंग ट्रॅकची मागणी, उपाययोजना होईपर्यंत नव्या इमारतींना परवानगी (सीसी) न देण्याची मागणी, १२ एफओबी व ५ आरओबी प्रकल्प १० वर्षांनंतरही अपूर्ण असणे, अशा अनेक विषय व घोटाळे व अपूर्ण प्रकल्पांची माहिती त्यांनी उघड केली होती । या सर्व मुद्द्यांवरून मुसळधार पावसात वसई–विरार महानगरपालिका मुख्यालयासमोर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मोठे आंदोलनही करण्यात आले होते. यासोबतच शासन–प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू होता । लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी, प्रवाशांचे मृत्यू व उद्ध्वस्त होत असलेल्या कुटुंबांच्या पार्श्वभूमीवर चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडोर या उपाययोजनेसाठी दिल्लीतील रेल्वे बोर्ड, रेल्वेमंत्री, पीएमओ व सीएमओ कार्यालयाशी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला होता. नायगाव ते विरार दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबविण्याचेही नियोजन होते; मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही.
कमर बेग यांनी आपल्या पत्रकारितेच्या १५ वर्षांच्या अनुभवासह सामाजिक कार्याचा पाया पक्षाच्या कामात वापरला. त्यांनी हे सर्व विषय आमदार व खासदारांकडे देऊन विधानसभा व संसदेत प्रश्न मांडण्याची विनंती केली होती । मात्र, पक्षात जिल्हा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी होती. पत्रकारांना मान-सन्मान न देणे, पक्षविस्तारासाठी कोणतेही ठोस प्रयत्न न करणे, मागील दोन वर्षांत एकही कार्यकर्ता शिबिर किंवा प्रशिक्षण कार्यक्रम न घेणे, आंदोलने व कार्यक्रमांचा खर्च जिल्हा अध्यक्षांनी न उचलता तो कार्यकर्त्यांवर टाकणे – अशा अनेक कारणांमुळे नाराजी वाढत गेली.
याच पार्श्वभूमीवर सक्षम व निष्ठावान कार्यकर्त्याची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत विविध सेल अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी प्रदेश अध्यक्ष व वरिष्ठ नेत्यांकडे लेखी शिफारस पत्रे दिली होती. मात्र, तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही कोणताही निर्णय न झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतःला उपेक्षित व लावारिस समजू लागले ।
या सर्व कारणांमुळे हताश होऊन जिल्हा मीडिया प्रमुख कमर बेग यांनी मुंबई प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला. तसेच संस्थापक अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, माजी आमदार सुनील भुसारा, पक्ष सचिव रविंद्र पवार, निरीक्षक प्रभाकर चालके व जिल्हा अध्यक्ष मनोज म्हात्रे यांनाही राजीनाम्याची प्रत प्रदेश कार्यालयात सादर करण्यात आली आहे। कमर बेग यांनी वसई–विरारमध्ये केलेल्या कार्याची दखल घेत अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. मात्र, त्यांचे स्पष्ट मत आहे की, ज्या पक्षात काम करण्याचे स्वातंत्र्य, वरिष्ठांचे सहकार्य, नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी ठोस पाठिंबा, विधानसभा व संसदेत प्रश्न मांडण्याची तयारी आणि पत्रकारांना सन्मान दिला जाईल, अशाच पक्षात ते कार्य करतील ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *