वसई विरार महानगर पत्रकार संघटनेची पोलीस आयुक्तांकडे आग्रही मागणी..
वालीव पोलिसांकडून मूळ तक्रारीकडे दुर्लक्ष, तर आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न
वसई, दि.24(प्रतिनिधी )
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत दिवसेंदिवस पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात जीव घेणे हल्ले होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वसईतील पत्रकार, तथा दैनिक वसई विकास चे कार्यकारी संपादक चंद्रकांत भोईर आपले पत्रकारितेचे कर्तव्य बजावत असताना यांच्यावर पाच जणांनी जीवघेणा हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत वालीव पोलिसांनी मूळ तक्रारीकडे दुर्लक्ष करीत, आरोपींविरोधात थातूर माथूर गुन्हा दाखल करून तक्रारदारांची बोलवण केल्याचे दिसून येते आहे. याबाबत वसई विरार महानगर पत्रकार संघटनेन तात्काळ बैठक घेऊन पत्रकार चंद्रकांत भोईर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणी कायदा सुव्यवस्था मोडीत काढणाऱ्या संबंधित पाच मारेकऱ्यांविरुद्ध "पत्रकार हिंसा प्रतिबंधक अधिनियम 2017" अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच एकंदर घटनेतील पत्रकार भोईर यांच्यासह तिघा बाधितांच्या तक्रारीनुसार पाचही मारेकऱ्याविरोधात
जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वसई विरार महानगर पत्रकार संघटनेतर्फे
पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणांत आरोपींना वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असल्यामुळे त्यातील आरोपींच्या अधिक संपर्कात असलेले विद्यमान चौकशी अधिकारी तात्काळ बदलणे आवश्यक असल्याचे स्थानिक गावाकऱ्यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री , मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 ,मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस स्टेशन यांनाही देण्यात आले असून, लवकरच मारेकऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल होईल, अशी आशा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पत्रकार चंद्रकांत भोईर हे दिनांक 20/7/2022 वृत्त संकलन करण्यासाठी चंद्रपाडा, वाकीपाडा बापाने, जूचंद्र, परिसरात गेले होते. दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान त्यांचे मित्र किशोर शेट्टी यांचा त्यांना तातडीचा फोन आला. त्यांच्या जागेत पाच इसम जबरदस्तीने त्यांची परवानगी न घेता घुसले आहेत व त्यांच्या कंपाऊंडचे काम करणारे आदिवासी कर्मचारी अजित ठाकरे व इतर दोन जण यांना लाठया काट्याने व लोखंडी सळ्यांनी मारहाण करत आहेत. या घटनेचे छायाचित्रण व वृत्तसंकलन करण्यासाठी चंद्रकांत भोईर यांना बोलवण्यात आले होते. इतर बातम्या बाजूला ठेवून चंद्रकांत भोईर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यावर गावातीलच पाच जण तिथे काम करणाऱ्या आदिवासी कामगार अजय ठाकरे व इतर दोघांना धरून मारहाण करीत असल्याचे त्यांनी पाहिले. या घटनेचे त्यांनी छायाचित्रण करण्यासाठी मोबाईल काढला असता, त्याचा राग येऊन हल्लेखोरांनी चंद्रकांत भोईर यांना देखील धक्काबुक्की करून लाट्याकाठ्या आणि सळ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
सदर हल्लेखोरांनी जमीनधारक किशोर शेट्टी यांच्या जागेत कोणतीही परवानगी न घेता जबरदस्तीने त्यांच्या मालमत्तेत घुसून कंपाउंड करण्यासाठी लावत असलेले सिमेंटचे पोल उपटून ते चोरून नेल्याचे उघड झाले आहे. तसेच गरीब आदिवासी कामगार अजय ठाकरे याला जातीवाचक शिवीगाळ करून त्याला देखील जबर मारहाण केली आहे. अशी माहिती शेट्टी आणि ठाकरे यांनी दिली आहे. वालीव पोलिसांनी तिघा तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रार दाखल करून घेतलेली नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. पत्रकार चंद्रकांत भोईर, व्यावसायिक किशोर शेट्टी व आदिवासी कामगार अजय ठाकरे यांनी स्वतंत्र लेखी तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी एका संयुक्त तक्रारीनुसार अतिशय सौम्य स्वसरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. वस्तुस्थिती आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तिघा बाधितांच्या तक्रारीनुसार या गुन्ह्यांमध्ये चोरी, ॲट्रॉसिटी व पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्ह्यांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत योग्य न्याय न मिळाल्यास लवकरच पोलीस आयुक्त मा. सदानंद दाते आणि पोलीस उपायुक्त मा. संजय पाटील यांची भेट घेतली जाईल, असे वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.