ठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा `कै. वामन अनंत रेगे’ हा नामांकित पुरस्कार ठाण्यातील पत्रकार, साहित्यिक विनोद पितळे आणि लेखिका विद्या प्रभू यांना देण्यात आला. केवळ ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांना ललित आणि ललितेतर या विभागात हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

ललित विभागात विनोद पितळे यांच्या काहीच्या बाही' या पुस्तकाला तर ललितेतर विभागात विद्या प्रभू यांच्यामालवणी वाक्प्रचार’ या पुस्तकाला हे पुरस्कार मिळाले. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुख्य शाखेत हा समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संग्रहलायचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, विश्वस्त वासंती वर्तक, अॅड. मकरंद रेगे, कार्याध्यक्ष विनायक गोखले उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात, बोली भाषांना कमी लेखणे ही काळाशी प्रतारणा असल्याचे मत संजय पाटील यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, पुरस्कारामुळे लेखकांना प्रोत्साहन मिळते. सध्याच्या काळात ओटीटी किंवा डिजीटल वाचनाचे प्रकार आले तरी छापील पुस्तके वाचनाची संस्कृती टिकून राहाणार आहे आणि हेच वास्तव आहे.

यावेळी विनोद पितळे आणि विद्या प्रभू यांनी आपापल्या पुस्तकांबाबत मनोगत व्यक्त केले. संग्रहालयाच्या वतीने चांगदेव काळे यांनी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची भूमिका विषद केली, तर अॅड. रेगे यांनी ज्यांच्यानावे हा पुरस्कार दिला जातो, त्या अॅड. वामन अनंत रेगे आणि अॅड. प्रभाकर वामन रेगे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर आणि संतोष कुदळे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मोही फडके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *