
प्रतिनिधी :
समाजसेवक परवेज अहमद सिद्धीकी यांनी वसई तहसील कार्यालयाकडे माहिती अधिकार अंतर्गत केलेल्या १२ अर्जांबाबत १५ दिवसात माहिती देण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाने दिले आहेत. मात्र राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशानंतर ही माहिती देण्यात आलेली नाही.
या बाबत अधिक माहिती अशी की, समाजसेवक परवेज अहमद सिद्धीकी यांनी वसई तहसील कार्यालयाकडे विविध विषयांबाबत १२ माहिती अधिकार अर्ज दाखल केले होते. सदरची माहिती न दिल्यामुळे त्यांनी प्रथम अपिल दाखल केले. प्रथम अपिलावर सुनावणीच घेण्यात आली नाही. त्यामुळे परवेज अहमद सिद्धीकी यांनी राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपिल दाखल केले. त्याची सुनावणी होऊन १५ दिवसात माहिती देण्याचे आदेश जन माहिती अधिकारी किसन गोरारी, अव्वल कारकून, तहसील कार्यालय वसई व नायब तहसीलदार उमाजी हेळकर यांना दिले. दि. १२ जुलै २०२१ रोजी राज्य माहिती आयोगाने आदेश दिले आहेत. आदेशानुसार १५ दिवसात म्हणजे २६ जुलैपर्यंत माहिती देणे आवश्यक असताना अद्याप पर्यंत माहिती देण्यात आलेली नाही. माहिती का देण्यात आली नाही व अपिल अर्जावर सुनावणी का घेण्यात आली नाही. सदर प्रकरणी नियमानुसार जन माहिती अधिकारी किसन गोरारी व अपिलिय अधिकारी उमाजी हेळकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत १५ दिवसात लिखीत खुलासा करावा, असे राज्य माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.