


वसई-विरार :
सोमवार, दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्तांसह मनपाचे वरिष्ठ अधिकारी, महावितरण, पोलीस, अग्निशमन दल तसेच विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांना उत्तम मार्गदर्शन देण्यात आले, याबद्दल समाजवादी पार्टीने आभार मानले असले तरी बैठकीच्या आयोजनावर राजकीय पक्षपातीपणाचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष कुमार राऊत यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “महानगरपालिकेने आयोजित केलेल्या अधिकृत बैठकीत व्यासपीठावर विशिष्ट राजकीय पक्षाचे माजी आमदार व माजी महापौर बसले होते. ही बैठक सर्वपक्षीय, सर्व गणेशोत्सव मंडळांसाठी होती, मात्र संपूर्ण व्यासपीठाचा ताबा फक्त एका पक्षाने घेतला होता. यामुळे अन्य पक्ष व समाजघटकांना दुय्यम वागणूक मिळाली.”
त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करत असताना माजी नेत्यांकडून हस्तक्षेप केला जात होता. मग महानगरपालिकेने त्यांना अशी विशेष वागणूक का दिली? जर एका पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठावर स्थान दिले असेल, तर इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही व्यासपीठावर बसवायला हवे होते.”
विशेष म्हणजे, वसई तालुक्याचे प्रथम नागरिक तहसीलदार अविनाश कोष्टी यांना व्यासपीठावर न बसवता खाली बसविण्यात आले, हा देखील गंभीर अपमान असल्याचे राऊत यांनी नमूद केले. “तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असूनसुद्धा त्यांचा अपमान हा लोकशाहीचा अवमान आहे,” असे ते म्हणाले.
कुमार राऊत यांनी महापालिकेला इशारा दिला की, “यापुढे अशा बैठका खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय व सर्वसमावेशक पद्धतीने आयोजित केल्या नाहीत, तर आम्हाला कार्यक्रमस्थळी निषेध नोंदवावा लागेल.”
सोबत व्यासपीठावरील मान्यवरांचे फोटोही पुराव्यासाठी जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
➡️ या प्रकरणामुळे वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रशासनावर पक्षपातीपणाचा ठपका ठेवला जात असून, आगामी दिवसांत यावर राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
