
शनिवार दिनांक 13 जून रोजी पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार ची वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त गंगाधरन डी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत समितीतर्फे वसईतील दोन प्रमुख विषयांवर चर्चा झाली.
डिसेंबर 2008 साली मंजूर झालेली 69 गावांची पिण्याच्या पाण्याची योजना जी आजपर्यंत पूर्ण का झाली नाही ? तसेच त्यासाठी अर्धवट खणून ठेवलेले रस्ते ज्यामुळे पावसाळ्यात मोठे अपघात घडू शकतात.
ज्यावर आयुक्तांनी समितीचे समन्वयक समीर वर्तक यांच्याकडून 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेची सर्व माहिती समजून घेऊन त्वरित या विषयांची संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मागवून घेतली असून अति. आयुक्त रमेश मनाले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खणलेले रस्ते त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश दिले.
तसेच मागील तीन वर्षांपासून पावसाळ्यात वसईत जी पूरपरिस्थिती निर्माण होते त्यासंदर्भात आयुक्तांनी संपूर्ण माहिती घेऊन पर्यावरण संवर्धन समितीतर्फे सुचविलेल्या सर्व उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी दोन वर्षांपूर्वी वसईतील पुरावर मात करण्यासाठी सुमारे 12 कोटी खर्च करून IIT व NEERI या संस्थेच्या मार्फत तयार केलेल्या अहवालाची ज्यावेळी आयुक्तांना माहिती देण्यात आली तेव्हा आयुक्तांना 12 कोटी खर्चाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्यावेळी IIT व NEERI च्या अहवालाची प्रत पर्यावरण संवर्धन समितीकडून आयुक्तांना उपलब्ध करून दिली.
सुमारे 30 मिनिटे चाललेल्या या बैठकीसाठी कोरोना आजाराचे संकट असल्याने फक्त दोनच जणांना बैठकीसाठी परवानगी मिळाली होती. या बैठकीसाठी पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरारचे समन्वयक समीर सुभाष वर्तक आणि सदस्य अभिजित घाग उपस्थित होते.