
उपअभियंता सुरेश शिंगाणेंचा संशयास्पद कारभार !
नालासोपारा :- वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘एच’मधील समता नगर येथे सुरू असलेल्या पाईप गटाराच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून ठेकेदाराला अप्रत्यक्ष संरक्षण देणार्या उपअभियंता सुरेश शिंगाणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष वसई रोड शहर उपाध्यक्ष महेश सरवणकर यांनी वसई-विरार महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘एच’ कार्यक्षेत्रातील नवघर-माणिकपूर वॉर्ड नंबर ९७ मध्ये ग्रीन हाऊस ते ट्रान्सफॉर्मर, गोकुळ पार्क येथे पाईप गटार बांधण्याचे काम सुरू आहे. सदर पाईप गटार बांधण्याचे काम मे. निळकंठ एंटरप्रायझेस यांना देण्यात आले असून सदर पाईप गटाराच्या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम २८ लाख २० हजार ८०२ एवढी आहे. सदर पाईप गटाराच्या कामात ठेकेदार करारनाम्यातील अटी-शर्तींचे उल्लंघन करून करत आहे. सदर पाईप गटाराच्या कामात अनेक त्रुटी असून सदर पाईप गटाराचे काम तकलादू सुरू आहे. कामाच्या ठिकाणी ठेकेदारांनी नियमानुसार फलक लावलेला नाही. पाईप गटाराच्या कामामध्ये रेतीऐवजी ग्रीट पावडरचा वापर सुरू आहे. तथा पाईप गटाराची लेव्हल रस्त्यापासून उंचावर घेतली आहे. त्यामुळे भविष्यात गटाराचे पाणी चेंबरमधून रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ठेकेदारांनी दोन पाईपऐवजी तीन पाईपनंतर चेंबर बसविले आहेत. त्यामुळे भविष्यात गटार साफ करताना अडथळे निर्माण होणार आहेत. तर गटाराच्या लाईनमध्ये असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी गटाराला वळसा दिलेला आहे. त्यामुळे पाणी सदर ठिकाणी अडून भविष्यात गटार तुंबण्याची शक्यता आहे. या सर्व गंभीर बाबींकडे उपअभियंता सुरेश शिंगाणे यांचे लक्ष नाही. उपअभियंता सुरेश सिंगाणे यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनदेखील उपअभियंता सुरेश शिंगाणे ठेकेदाराला अप्रत्यक्ष पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत.
प्रभाग समिती ‘एच’मधील पाईप गटाराच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून ठेकेदाराकडून सुनियोजित नव्याने काम करून घेऊन ठेकेदाराला अप्रत्यक्ष पाठीशी घालणार्या उपअभियंता सुरेश शिंगाणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे महेश सरवणकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.