वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ हद्दीत येणाऱ्या पाचू बंदर स्मशानभूमी समोर, बोटी लावल्या जाणाऱ्या परिसरात साठवलेल्या कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन बोटी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती आमदार स्नेहा दुबे पंडित ताईंच्या कार्यालयास कळविल्यानंतर तात्काळ फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले असून, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र या घटनेमुळे वसई–विरार महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बंदर परिसरात व स्मशानभूमीसमोर मोठ्या प्रमाणावर कचरा साठवला जात असताना, त्याची वेळेत उचल, वर्गीकरण व सुरक्षित विल्हेवाट का लावली गेली नाही?
आग लागण्यास पोषक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का? याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचणे हे केवळ अस्वच्छतेचे नव्हे तर आग, प्रदूषण आणि जीवितास धोका निर्माण करणारे गंभीर प्रकार ठरत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने केवळ आगीवर नियंत्रण मिळवणे नव्हे, तर दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *