पालघर (प्रतिनिधी): पालघरमधील उमंग फाऊंडेशनने ग्रामीण रुग्णालयाला पोर्टेबल एक्स-रे मशीन सामाजिक दायित्व म्हणून भेट देण्यात आली. या यंत्राचे प्रातिनिधिक छायाचित्र मंगळवारी फाउंडेशन मार्फत जिल्हाधिकार्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे, निवासी उप जिल्हाधिकारी किरण महाजन, जिल्हा महसूल तहसीलदार उज्वल भगत, ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिनकर गावित आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत.आपली नैतिक जबाबदारी म्हणून रुग्णांसाठी ही यंत्रणा सर्व काही विसरून करत असलेले कार्य वाखाणण्याजोगी आहे. सामाजिक जाणिवेतून उपकृत व्हावे या उद्देशाने क्ष-किरण यंत्र मदत देऊन या परिस्थितीत आपण खारीचा वाटा उचलल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संध्या पाटील यांनी सांगितले.

करोना परिस्थिती मध्ये अनेक संस्था प्रशासनाला सामाजिक दायित्वतून मदत करीत असून ही मदत इतर जिल्ह्यांच्या मानाने चांगली असल्याचे पालघरच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ, कांचन वानरे यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात करोनाचे संकट ओढवले असताना प्रशासनासह सर्वांनी एकत्रित येत या संकटावर मात करण्‍यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी केले. जिल्ह्यात ग्रामीण भागात ३०११ रुग्णांपैकी २२०० रूग्ण बरे झाल्याचे समाधानही त्यांनी यावेळी व्यक्त केले. मात्र लक्षणे आढळल्यानंतर नागरिक उशिराने रुग्णालयांकडे उपचारासाठी येत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अशावेळी लक्षणे असलेल्या नागरिकांनी न घाबरता रुग्णालयांमध्ये येउन उपचार घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन या काळात अशा रुग्णांसाठी उपचार देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सरकारला अशा सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून मिळालेल्या दातृत्वा ने पाठबळ मिळते यासाठी सर्वांनी सामाजिक जाणिवेतून पुढे येऊन जास्तीत जास्त दातृत्व देण्याचे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.

समाजसेवेचा कौटुंबिक वारसा लाभलेल्या प्रेरणेतून उमंग संस्था उभी राहिली असल्याचे व पुढे सामाजिक दायित्व म्हणून विविध मदत करण्याचे प्रयोजन असल्याची माहिती संस्थेचे सल्लागार रमाकांत पाटील यांनी यावेळी दिली. तसेच करोना काळात जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक करून जिल्हावासीयां तर्फे जिल्हा प्रशासनाचे व जिल्हाधिकारी यांचे आभार मानले. यावेळी उमंग संस्थेच्या सदस्यांसह जिल्हा व आरोग्य प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *