
जिल्ह्यातील पत्रकारांनी लेखणीऐवजी हाती बॅट घेऊन लगावले षटकार आणि चौकार !



महाराष्ट्र वृत्तपत्र संघ – अ अंतिम विजेता, तर द प्रेस क्लब (इलेक्ट्रॉनिक) ऑफ वसई विरार उपविजेता !
वसई, दि.24(वार्ताहर )
वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या “महानगर पत्रकार चषका”साठी पालघर, मीरा-भाईंदर आणि वसईचे सुमारे सव्वाशे पत्रकार आठ टीमच्या माध्यमातून वसई पश्चिमेच्या सनसीटी मैदानावर इतक्या मोठया संख्येने जिल्ह्यातून प्रथमच एकत्र आले होते . यावेळी पालघर जिल्हा पत्रकार संघ , मीरा भायंदर प्रेस क्लब युथ ब्रिगेड , वसई विरार महानगर पत्रकार संघ, द प्रेस क्लब (इलेक्ट्रॉनिक ) ऑफ वसई विरार , वसई तालुका पत्रकार संघ, लॉर्ड बुध्दा यु-ट्युब पत्रकार संघटन, महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना संघ अ आणि ब यासह अनेक पत्रकार संघाच्या संघांनी भाग घेतला. या स्पर्धातील चौथा क्रमांक वसई विरार महानगर पत्रकार संघ , तिसरा क्रमांक महाराष्ट्र वृत्तपत्र संघ – ब , दुसरा क्रमांक द प्रेस क्लब (इलेक्ट्रॉनिक) ऑफ वसई विरार तर प्रथम क्रमांक हा महाराष्ट्र वृत्तपत्र संघ – अ या संघांनी वसई विरार महानगर पत्रकार संघाच्या “महानगर पत्रकार चषका”वर आपले नाव कोरले .दैनंदिन विविध क्षेत्रातील माहिती आणि बातम्या मिळवून लेखणी चालवणारे हात या दिवशी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत षटकार नि चौकार मारून प्रतिस्पर्धीना पराभूत करण्यात गुंतले होते. जिल्ह्यातील सव्वाशेहून अधिक पत्रकार यावेळी उपस्थित होते .
वसई विरार महानगर पत्रकार संघ पुरुस्कृत “महानगर पत्रकार चषका”च्या टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंटच्या उदघाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर, तथा कामगार नेते राजीव पाटील, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे युवा नेते पंकज देशमुख , भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर , प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे, वसई विरार महापालिका उपायुक्त डॉ.किशोर गवस उपस्थित होते. या प्रसंगी राजीव पाटील, पंकज देशमुख, किरण भोईर, स्वप्नील तांगडे आणि संयोजक अनिलराज रोकडे यांनी सलामीची फलंदाजी व गोलंदाजी करीत सहभाग नोंदवून स्पर्धाकांचा उत्साह वाढवला.
स्वतःच्या शारीरिक समतोलासाठी आणि खिलाडू वृत्तीच्या संवर्धनासाठी पत्रकारांनी अश्या स्पर्धातून एकत्र येणे गरजेचे असून, त्यांनी विधायक लेखनाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून सक्रिय राहिले पाहिजे. अश्या उपक्रमांना माझा नेहमीच पाठींबा राहीन, असे आश्वासन देऊन, माजी महापौर राजीव पाटील यांनी वसई विरार महानगर पत्रकार संघाने क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना प्रथमच एका मैदानावर संघटित केल्याबद्दल कौतुओगार काढले. तसेच येत्या दि.29 एप्रिल च्या पालघर मधील ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या मोर्च्यास सर्व पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले.
अनेकदा राजकीय स्वार्थापोटी विविध पक्षीय आम्ही राजकारणी सुद्धा एकत्र येत असतो, परंतू वृत्तपत्रातील स्पर्धा आणि वैयक्तिक महत्वकांक्षेमुळे पत्रकार सहसा एकत्र आलेले पाहायला मिळत नाहीत. परंतू क्रिकेट स्पर्धाच्या निमित्ताने पालघर, वसई आणि भाईंदरचे पत्रकार प्रथमच एका मंच्यावर आणून वसई विरार महानगर पत्रकार संघाने इतिहास घडविला आहे. सव्वाशे पत्रकार आपल्या व्यक्तिगत अस्मिता बाजूला सारून केवळ एकदिवासीय विरंगुळा आणि त्यातून अखंडतेचा संदेश देण्यासाठी एकत्र आलेत हे गौरावस्पद आहे. यापुढे अश्या स्पर्धेच्या आयोजनासाठी माझे भरीव योगदान मी देईन, असे आश्वासन पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी स्पर्धेच्या बक्षीस वितरण आणि समोरोप प्रसंगी संयोजक वसई विरार महानगर पत्रकार संघास प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना दिले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार जगदीश भुवड उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते चारही विजेत्या संघाना विशेष ट्रॉफी देऊन, तसेच उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या स्पर्धाकांना वैयक्तिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्पर्धे दरम्यान, माजी विरोधीपक्षनेते विनायक निकम, महापालिकेचे सहआयुक्त विश्वनाथ तळेकर, प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक, वसई तालुका आगरी सेनेचे अध्यक्ष भूपेश कडुलकर, भाजपच्या जिल्हा सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बकुलभाई मेहता, कोकण मराठी साहित्य परिषदेचे वसई कार्यवाह संतोषकुमार गायकवाड आदींनी भेटी देऊन स्पर्धाकांना प्रोत्साहन दिले. . उदघाट्न आणि समारोप समारंभाचे प्रस्ताविक वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांनी केले. सूत्रसंचालन आणि स्पर्धाचे समलोचन नितीन आळवे आणि महेश पाटील यांनी केले. या वेळी वसई, पालघर व भाईंदर मधील अनेक जेष्ठ पत्रकार व विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.