
पालिकेचे पहिले सेनापती म्हणून अनधिकृत बांधकामांविरोधात सिंघम ठरलेले सतीश लोखंडे पुन्हा गैरबांधकामांविरोधात मैदानात उतरतील
भतग्रस्त जनता, कोरोनाची लाट यातून तारून नेण्याचे काम आयुक्त सतीश लोखंडे यांचे -दरम्यान, वसईतील वाढती कोरोना लाट आणि त्यामुळे भयग्रस्त झालेली जनता. वसईतील आरोग्य सुविधांचा ठणठणाट, अपुर्या आरोग्य सेवेमुळे रूग्णांची फरफट, खाजगी रूग्णांची लुटमार, अपुर्या खाटा, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, लसीकरणातील अनिश्चितता यासारख्या समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्याबरोबरच वसईतील वाढता कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक सतीश लोखंडे यांना झपाट्याने काम करावे लागणार आहे. आयुक्त गंगाथरन डी. यांच्या गैरहजेरित अनुभवी आयुक्त म्हणून सतीश लोखंडे यांना आपला पूर्ण प्रदीर्घ प्रशासकीय सेवेचा अनुभव पणाला लावावा लागणार आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गंगाथरन डी. यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेचा कोरोना आपत्ती काळातील कारभार सांभाळण्यासाठी सतीश लोखंडे यांच्यावर शासनाने विश्वास टाकला आहे. आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारीदेखील असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत सतीश लोखंडे यांना आयुक्त आणि प्रशासक अशा दोन्ही पदांची धुरा वाहावी लागणार आहे. वसईतील वाढता कोरोना उद्रेक, हतबल ठरलेली आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय सुविधांचा ठणठणाट, भयग्रस्त नागरिक हे चित्र सतीश लोखंडे यांना अतिरीक्त आयुक्त पदाच्या काही दिवसांच्या कालावधित बदलण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रशासकीय सेवेतील त्यांचा प्रदिर्घ अनुभव वसईकरांना दिलासा मिळवून देईल का, ते येत्या काही दिवसांत पाहणे रंजक ठरणार आहे.
आयुक्त गंगाथरन डी. यांची वसई-विररामधील एन्ट्री फारशी पचण्यासारखी ठरलेली नाही ती त्यांच्या कारभारामुळे. अनधिकृत बांधकामांविरोधात सातत्याने घेतलेली बोटचेपी भुमिका, एका राजकीय पक्षाच्या विशीष्ट हेतूने प्रेरित झालेले प्रतिबिंब त्यांच्या कारभारात बर्याचदा डोकावत असल्याचे अनेक आरोप मध्यंतरैच्या काळात त्यांच्यावर वसईतीलच काही राजकीय पक्षांनी केले. कडक लॉकडाऊन काळात कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश आणि प्रामुख्याने लाखो स्क्वेअर फुटाची डोकं बाहेर काढलेली अनधिकृत बांधकामं अशा वावटळीत पालिका प्रशासनाच्या कारभारावर अनेक स्तरातून चिखलफेक देखील झाली. मनसेसारख्या पक्षाने अनधिकृत बांधकामांचं प्रदर्शन भरवरून त्याचे उपरोधिक उद्घाटन प्रशासक तथा आयुक्त गंगाथरन डी. यांच्या हस्ते करण्याचा मनसेचा प्रयत्न आयुक्त गंगाथरन डी. यांच्या उदासीन आणि निष्क्रीय कारभाराचे प्रतिक ठरले. आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. या काळात महापालिका हद्दीत ठाण मांडून असलेली कोरोनाची दुसरी लाट निस्तरण्यासाठी सतीश लोखंडे या अधिकार्याला पाचारण करण्यात आले आहे. सन 3 जुलै 2009 साली स्थापन झालेल्या महापालिकेचे पहिले सनदी अधिकारी म्हणून पालिकेचे सेनापती पद अर्थात आयुक्त पद भुषवण्याचा मान त्यांना शासनाने दिला. या काळात त्यांनी वसई-विरारमधील वाढलेल्या अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणात रट्टा मारला. स्वतंत्र सी.यु.सी पथकाची स्थापना करून अनधिकृत बांधकामांवर कारवायांचा ससेमिरा सुरूक्ष ठेवला. प्रसंगी स्वत: मैदानात उतरून त्यांनी असंख्य अनधिकृत बांधकामं निष्कासित केली. त्यांच्या कार्यकाळात अल्पावधीतच ते अनधिकृत बांधकामांना नेस्तनाबूत करणारे सिंघम ठरल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावदेखील झाला होता. आता पुन्हा त्यांच्या हातात वसई-विरारची सुत्र देण्यात आल्याने भूमाफियांच्या पायाखालची जमीन सरकली असेल हे नि:संशय.
कोरोना काळात महापालिका हद्दीत सुरू असलेला अनधिकृत बांधकामांचा तमाशा थांबवण्याचे, भूमाफियांची कारस्थानं मोडित काढण्याचे आव्हान नवे अतिरीक्त आयुक्त सतीश लोखंडे यांना पेलावे लागणार आहे. पुन्हा एकदा त्यांच्या संकल्पनेतील सी.यु.सी. विभागाला बळ देऊन अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीमा तिव्र करण्याचे काम लोखंडे यांनी केल्यास भूमाफियामुक्त महापालिका चित्र पालिकेला पुन्हा अनुभवता येईल, असा विश्वास नागरिकांना वाटतो. आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. हे कोरोनातून बरे होईपर्यंत महापालिकेचा कारभार सतीश लोखंडे यांच्याकडे आहे. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनातील ओळख आहे. त्यामुळे कोरोना काळात सतीश लोखंडे यांच्यासारखा अधिकारी काही दिवसांसाठी का होईना पालिकेला लाभल्याने वसईकरांना हायसे वाटले आहे.