अविनाश जाधव यांच्या राड्यानंतर पालिकेने मनसेची शाखा तोडली !

 

मनसैनिकांमध्ये संतापाचे सूर;आयुक्त व सहा. आयुक्तावर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

नालासोपारा(प्रतिनिधी) – मंगळवारी मनसेचे पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई विरार पालिकेच्या मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर गंगाथरण डी. यांना शिवीगाळ करत राडा केल्यानंतर काल गंगाथरण डी.यांनी नालासोपारा पश्चिमेकडील मनसेच्या अनधिकृत शाखेवर तोडक कारवाई केली आहे.पालिकेने थेट मनसेची शाखा तोडल्याने पालिका आयुक्त व मनसे मध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडली आहे.त्यामुळे यापुढे मनसे विरुद्ध गंगाथरण डी. असा संघर्ष उभा राहणार असल्याचे यावरून स्पष्ट होते.या तोडक कारवाई नंतर अविनाश जाधव यांनी एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओ द्वारे आयुक्तांच्या मनमानी व पक्षपाती कारभाराचा निषेध नोंदवत वसई विरार मधील सर्व राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनाही जाधव यांनी लक्ष करत ठाकुरांनी आता आयुक्तांचा बंगला तोडण्यासाठी पाठवावे असे वक्तव्य केले आहे.
दरम्यान पालिकेचे प्रभाग समिती ई चे सहा. आयुक्त पंकज भुसे यांनी या शाखेवर कारवाई करताना अनधिकृत बांधकाम असल्याचे कारण पुढे केले आहे.परंतु भुसे यांनी पालिका क्षेत्रात सुरु असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकमांकडे दुर्लक्ष करून केवळ आयुक्तांच्या आदेशाने सूडबुद्धीने कारवाई केल्याचे मनसे महापालिका कामगार सेनेचे सरचिटणीस चंद्रशेखर गुंजारी यांनी सा. युवाशक्ती एक्सप्रेस कडे बोलताना सांगितले.विशेष म्हणजे कोणतीही नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली.त्यामुळे या कारवाईवर अनेक सवाल उपस्थित होत आहे. तसेच ही कारवाई करताना पालिकेने कार्यालयात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा देशाचा तिरंगा व राजमुद्रा असलेल्या पक्षाचा झेंड्याची विटंबना केल्याने आयुक्त व सहा. आयुक्त यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसे ने केली आहे.दुसरीकडे या कारवाईमुळे मनसैनिकही संतप्त झाले आहेत. आज त्यांनी पालिकेच्या नालासोपारा विभागीय कार्यालयावर धडक देत आंदोलन केले.या सर्व घडामोडीमुळे ऐन कोरोना महमारीत वसई विरार मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’हद्दीतील वरूण इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये पालिकेने १००० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये अवघ्या ०५ दिवसात सौम्य लक्षणे असलेले व लक्षणे दिसत नसलेले ६१० पॉझीटीव्ह रूग्ण दाखल करण्यात आलेले होते. परंतु या कोविड सेंटरमधील रूग्णांच्या गैरसोयीचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.या कोविड सेंटरमध्ये उपचाराच्या नावाखाली रुग्णांचा जीवघेणा छळ केला जात असल्याची बाब मनसे च्या निदर्शनास अली होती.त्या अनुषंगाने मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव याप्रकरणी आपले पदाधिकारी वितेंद्र पाटील, जयेंद्र पाटील, प्रवीण राऊत आणि इतर कार्यकर्त्यांसह या कोविड सेंटर ची पाहणी करून मंगळवारी दुपारी आयुक्त गंगाथरन डी. यांना भेटण्यासाठी मुख्यालयात गेले होते. मात्र फक्त दोनच कार्यकर्त्याला आपल्या दालनात पाठवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यामुळे जाधव आक्रमक झाले होते. त्यातच आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी लॉकडाऊनसंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्या वेळीसुद्धा मनसेला दूर ठेवले गेले होते. शिवसेना नेते आयुक्तांना भेटतात, तेव्हा त्यांच्याबरोबर ८-१० जण तरी असतात. मग आम्ही चार जण चर्चा करणार असू, तर त्यात गैर काय आहे, असा सवाल करत जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोविड सेंटरमधील हेळसांड कारभाराचे फोटो आयुक्तांच्या दरवाजावर चिकटवले. त्यानंतर आयुक्तांना उद्देशून शिवीगाळ करून निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली होती. दरम्यान मनसेच्या राड्यानंतर बिथरलेल्या गंगाथरण डी.यांनी नालासोपारा पश्चिमेला असलेल्या मनसेच्या शाखेवर कारवाई केली.

◆ आयुक्त की शिवसैनिक;मनसेची बॅनरबाजी

वालीव येथील महापालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींचा जाब विचारण्यासाठी मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालिका मुख्यालयात आयुक्तांनी भेट नाकारल्याने राडा केला. दरम्यान या राड्यानंतर आयुक्तांनी मनसेची शाखा तोड्याने मनसैनिक संतप्त झाले आहेत. काल विरार परिसरात आयुक्त की शिवसैनिक अशी बॅनरबाजी करत गंगाथरण डी. यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.तसेच आयुक्त हे केवळ शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याना भेटत असल्याने ते शिवसैनिक आहेत का? असा प्रश्न विचारत आयुक्तांना लोकसेवकच म्हणून राहण्याचा सल्ला दिला.

ठाकुरांनी आता आयुक्तांचा बंगला तोडण्यासाठी पाठवावे-अविनाश जाधव

दुसरीकडे पालिकेच्या कारवाईनंतर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्तांच्या बंगल्याला लक्ष केले आहे. काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकुरांनी जाहीर सभेत एका शिवसेनेच्या नेत्याचं घर अनधिकृत आहे ते तोडण्यासाठी पाठवू का?’का असे विचारले होते.आता ठाकुरांनी आयुक्तांचा अनधिकृत बंगला तोडण्यासाठी पाठवण्याची हिंमत दाखवावी असे वक्तव्य जाधव यांनी केले आहे.आयुक्तांनी स्वतः पालिकेतून कोणतीच रितसर परवानगी न घेता तब्बल २० लाख खर्च करून ऐन लॉकडाऊन मध्ये बंगल्याचे नुतनीकरण केले होते. त्यामुळे एकीकडे अनधिकृत असल्याचे सांगत कार्यालय तोडणाऱ्या आयुक्तांचा बंगलाही अनधिकृत असून त्यावरही कारवाई झाली पाहिजे असे जाधव यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *