
वसई(प्रतिनिधी)-उन्हाळा संपून पावसाळा जवळ आला तरी वसई-विरार शहरात शीतपेयाच्या तपासणी अद्याप झाली नसून मनपाचे अधिकारी एकमेकांवर जबाबदाऱ्या झटकून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य आणि भटके विमुक्त आघाडीचे वसई-विरार शहर जिल्हा अध्यक्ष अशोक शेळके यांनी केला आहे. याप्रकरणी जाणीवपूर्वक होत असलेल्या दिरंगाईबाबत शासनाने लेखी खुलासा मागवावा आणि यास जबाबदार असणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून तात्काळ वसई-विरार शहरात शीतपेय तपासणी करावी अशी मागणी अशोक शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकात दूषित शीतपेय बनवले जात असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ असे अनेक प्रकार सोशल मीडियावरून उघडकीस येत आहेत. वसई-विरार शहरात ठिकठिकाणी शीतपेय, थंड पदार्थ यांची विक्री होताना दिसत आहे. उन्हाळ्यात याला मागणी असल्यामुळे जागोजागी विक्रीत आपल्या हातगाड्या उभ्या करून याची विक्री करताना दिसून येतात मात्र यासाठी वापरण्यात येणारे पाणी, बर्फ, रंग याची प्रशासनाकडून कोणतीही तपासणी होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातत्याने महानगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही याबाबत चालढकलपणा होत आहे. वसई-विरार शहरातील शीतपेयांच्या तपासणी करण्यासाठी लवकरच पथक नेमण्यात येणार असे सुरुवातीला महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून सांगण्यात आले. त्यानंतर निवडणुकीचे कारण पुढे करून मनुष्यबळाअभावी शक्य झाले नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध लेले यांच्याकडे विचारणा केली असता अजून आम्हाला अशी कोणतीच सूचना मिळालेली नाही, पथक नेमण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत आम्हाला पथक नेमण्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही, नागरिकांकडून तक्रार आली तरच कारवाई केली जाईल. प्रत्येक प्रभाग समितीचे सहायक आयुक्त याकडे लक्ष देतील. असे उत्तर आरोग्य अधिकाऱ्याकडून देण्यात आले.सुरुवातीला आयुक्तांनी ही जबाबदारी आरोग्य अधिकाऱ्यावर झटकली नंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे प्रभारी आयुक्त लक्ष देतील असे सांगितले. मुळात इच्छाशक्तीचा अभाव आणि जबाबदारीचे भान नसल्यामुळे प्रशासनाचे या सार्वजनिकदृष्ट्या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अशोक शेळके यांनी केला आहे.