सूर्या, वैतरणा, पेल्हार धरणाची पाणी पातळी वाढली

वसई : (प्रतिनिधी) : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने वसई विरार महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी धरणे कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर होती. अवघा 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा या धरणांत शिल्लक असल्याने मोठी चिंता व्यक्त होत होती. महिनाभरात पाऊस पडला नाही तर वसई विरारकरांवर पाणीसंकट ओढवण्याची चिंता व्यक्त होत होती. परंतु पावसाने गुरूवारी रात्रीपासून ते रविवारपर्यंत चांगला जोर धरल्याने सूर्या, पेल्हार, उसगाव धरणांतील पाणीपातळीत समाधानकारकरित्या वाढ झाली आहे. धरण क्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न मिटण्यास मदत होणार आहे.
एकाच दिवसात पावसाने 177 मिलीमीटर नोंद केल्याने पाऊस समाधानकारक झाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहताना दिसला. पहिल्या पावसात वसई विरारमधील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने यंदाही अतिवृष्टी झाली तर वसई विरारकरांना घरात अडकून पडावे लागले आहेत. सध्या वसईमधील विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाविरोधात टिकेचा भडीमार करू लागले आहेत ते पहिल्याच पावसात झालेल्या हलक्या पुरामुळे. वसई, नालासोपारा विरारमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. सखल भागांतील घरादारांत पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तानसा, वैतरणा, भातसा धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या धरणांतील पाणीपातलीत चांगली वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा वेग वाढणार असून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. वसई विरारमधील पाण्याचे निचरा करणारे नैसर्गिक मार्ग बेकायदेशीर बांधकामांनी बंदीस्त झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका येथील सामान्य नागरिकांना बसणार आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांत पाणी साचून त्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही ही परिस्थिती उद्भवली तर वसई विरार महापालिका तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नाही. तब्बल 12 करोड रूपये खर्चून करण्यात आलेला भौगोलिक सर्व्हे आीन त्यानंतर निरी तसेच आयआयटी या सत्यशोधन समित्यांनी पालिकेला दिलेला अहवाल पाहता पालिका प्रशासनाने पावसाळा नियोजनाच्या दृष्टीने कोणतीही कामे केलेली नाहीत. त्यामुळे पालिकेविराधात नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed