

वसई : काँग्रेसच्या कार्यक्रमात वाटप करण्यात आलेल्या पुस्तकातून सावरकरांची बदनामी करण्यात आली आहे. या पुस्तकावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपा वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातुन मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झालेल्या काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात सावरकरांच्या संदर्भातील पुस्तक वाटप करण्यात आलं होतं. या पुस्तकात सावरकरांची बदनामी करणारा आक्षेपहार्य मजकूर छापण्यात आलेला आहे. या पुस्तकाची माहिती मिळताच त्यावरून भाजपने काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.
आमचे आराध्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अतिशय घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण असलेली पुस्तिका काँग्रेस पक्षाने वितरित करून आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. काँग्रेस पक्षाची ही बौद्धिक आणि मानसिक दिवाळखोरी आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर वसई तालुक्यात ही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. भाजपा वसई रोड मंडळाने भादंवि कलम 120, 500, 503, 504, 505 आणि 506 अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वसई रोड मंडळाकडून तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या एका पत्रात करण्यात आली आहे.
यावेळी उत्तम कुमार यांनी बोलताना,
स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान होते आणि आहेत. त्यांची बदनामी महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार अशा शब्दात उत्तम कुमार यांनी काँग्रेसला सुनावले आहे.