
नालासोपारा :- वसई पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यातर्फे सहा आदिवासी महिलांना मारहाण केल्याचा आरोपावरून आदिवासी संघटनेतर्फे पोलीस ठाण्यावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पापडी येथे राहणाऱ्या सहा आदिवासी महिलांतर्फे बाजारात चोरी झाल्याच्या संशयावरून वसई पोलिसांनी पापडी पोलीस चौकीत चौकशीसाठी नेले होते. मात्र यावेळी त्यांना चौकशी दरम्यान मारहाण केल्याचा आरोप या महिलांनी केला होता. तसेच या प्रकरणी आदिवासी संघटनेतर्फे तक्रार दिल्यानंतर पोलिसांतर्फे या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला असताना संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. मात्र त्यानंतर गुरुवारी आदिवासी संघटनेतर्फे वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला होता. या मोर्चा मध्ये आदिवासी महिलांसह वसईतील भूमिपुत्र म्हणून विजय पाटील हे देखील सहभागी झाले होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दोन दिवसात त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी पत्र देखील देण्यात आले. यावर चौकशी सुरू असून अहवाल लवकरात लवकर तयार करू आणि दोषी आढळल्यास कारवाई करू असे आश्वासन परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी मोर्चेकरांना दिले.
