
विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी विरार, नालासोपारा मतदारसंघात दिवसभर सुरू असलेला रिमझिम पाऊस अंगावर झेलत झंझावाती प्रचार केला. शर्मा यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजपा, रिपाई आणि मित्रपक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे छोटे गट सर्व मतदारसंघात फिरत होते. याशिवाय एक जबरदस्त धडाकेबाज रॅली काढून प्रदीप शर्मा यांनी सकाळपासून संध्याकाळी प्रचार संपेतो सर्व मतदारसंघ जणू ढवळून काढला. भाजपा महासचिव राजन नाईक, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या रॅलीत भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह या देखील सहभागी झाल्या होत्या.
नालासोपारा मतदारसंघात शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाची रिमझीम सुरू आहे. मात्र हा पाऊस म्हणजे वरुणराजाचा विजयी भव असा आशीर्वादच असल्याचे सांगत शर्मा यांनी प्रचाराला शनिवारी सकाळीच सुरुवात केली. शेकडो बाईकस्वार, रिक्षा, मोटारी आणि असंख्य कार्यकर्ते सोबतीला घेऊन शर्मा यांनी ही रॅली बहुतांश मतदारसंघातून फिरवून त्यांची निशाणी असलेल्या धनुष्यबाणाला म्हणजेच विकासाच्या व्हीजनला मत देण्याचे आवाहन मतदारराजाला केले. तुमच्या आजवरच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी आहे, मी इथल्या विकासाची, संपन्न नालासोपारा, विरार घडवण्याची जबाबदारी घेतली आहे, असा संवाद त्यांनी नागरिकांशी रॅलीदरम्यान साधला. त्यांच्या आवाहनाला बैठ्या चाळी, इमारती, सोसायट्या, दुकानदार या सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.
गेले काही दिवस शर्मा यांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सोबत घेत मतदारसंघातील पारडे फिरवले आहे. बविआच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या भागांतही त्यांना रहिवासी प्रतिसाद देत आहेत. आजही विरार, नालासोपारातील अनेक ठिकाणी रहिवासी शर्मा नावाच्या या आश्वासक, समर्थ पर्यायाला स्वत:हून हात उंचावून प्रतिसाद देत होते, हात मिळवत होते. भगवे ध्वज, महायुतीतील पक्षांचे झेंडे, टोप्या आणि गळपट्टे घातलेले कार्यकर्ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
प्रदीप शर्मा नावाचे हे वादळ येत्या 21 तारखेला येथील मुजोर सत्ताधाऱ्यांना भुईसपाट करणार याचा अंदाज आता अनेक राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर वातावरण कमालीचे बदलले असून, भगवा फडकवायचाच या पराभवाचा अंदाज आल्यामुळे आता बविआने रडीचा डाव सुरू केला असून अनेक खोटीनाटी कारस्थाने सुरू केली आहेत.