
नालासोपारा :- वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापना विभागात उपायुक्तपदी दीपक कुरळेकर यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी ११ ऑगस्ट २०२० रोजी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रतिनियुक्तीवर येऊन दोन वर्षे उलटली तरी देखील दीपक कुरळेकरांची अद्याप बदली करण्यात आली नाही. विशेष म्हणजे आस्थापना विभागाचे सर्वेसर्वा रवी पाटील यांनी कुरळेकरांच्या बदलीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. याहूनही एक पाऊल पुढे जात रवी पाटील यांनी राज्य शासनाचे नियम धाब्यावर बसवत आपल्या मर्जीतील अनेकांना महत्त्वाच्या पदांवर बसवत आपले खिसे गरम करण्याकडे करण्याकडे जास्त लक्ष केंद्रीत केले आहे.
राज्य शासनाच्या बदली व प्रतिनियुक्तीच्या धोरणाबाबत माहिती देताना चरण भट यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार, सेवानिवृत्तीस दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असताना प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांस मूळ संवर्गात परत येणे आवश्यक राहील, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या धोरणानुसार मुळ संवर्गात बदली होणे अपेक्षित असतानाही कुरळेकर आजही वसई-विरार महानगरपालिकेतच ठाण मांडून बसून आहेत. त्यामुळे दीपक कुरळेकरांना त्यांच्या मूळ संवर्गात परत पाठवावे, अशी मागणी चरण भट यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे.