
प्रतिनिधी
विरार : ‘मी आणि माझे सर डॉ. सत्यपाल सिंग चर्चा करत होतो. तेव्हा वसईतील गुंडागर्दीचा विषय निघाला होता. आम्ही मुंबईतील कित्येक गुंड मुंबईबाहेर पळवले. दाऊदही त्यात होता. “मुंबई मे पेहतीस साल मैने भाइयो पे भाईगिरी की है, मै भाईओंका भाई हू, डॉ. सत्यपाल सिंग म्हणाले त्याप्रमाणे तेव्हाच लक्ष देऊन दोन गोळ्या वसईत झाडल्या पाहिजे होत्या” असे खळबळजनक वक्तव्य नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांनी रविवारी विरार-फुलपाडा येथील आपल्या प्रचार सभेत केले होते.
प्रदीप शर्मा यांनी केलेल्या या वक्तव्यावर वसई-विरार शहरातील नागरिकांत तीव्र पडसाद उमटले आहेत. वसई-विरारकरांच्या संतापाचा परिणाम मतपेटीतून उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रदीप शर्मा यांनी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच वसई आणि नालासोपार्यातील गुंडागर्दीवर वक्तव्ये केली होती. आपण ही गुंडागर्दी मोडून काढण्यासाठी येथे आलो आहोत, असे सांगून ते येथील नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि प्रदीप शर्मा यांच्याकडे वसई-विरारबाबत कोणतेही व्हिजन नाही. येथील समस्यांचे निराकरण ते कसे करणार? याबाबत कोणतीही वाच्यता ते करत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
केवळ गुंडागर्दीवर बोलून ते आपली पोलिसी छबी गडद करत असल्याचा प्रत्येय येतोय, मात्र याचा कोणताही उपयोग होणार नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. विरार-फुलपाडा येथे झालेल्या सभेदरम्यानही त्यांनी हेच वाक्य पुन्हा उच्चारून वसई आणि वसईकरांच्या आत्मसन्माला ठेच पोहोचवली असल्याच्या प्रतिक्रिया सभेनंतर उमटल्या आहेत.
प्रदीप शर्मा यांच्या या वक्तव्याचा समाचार वसई आणि नालासोपारातील सूज्ञ नागरिक मतपेटीतून नक्कीच घेतील, असे मत काही नागरिकांनी या वेळी व्यक्त केले.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंंबिका पाल, भाजप खासदार डॉ. सत्यपाल सिंह, भोजपुरी सुपरस्टार निरहुआ यांच्या उपस्थितीत रविवारी प्रदीप शर्मा यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत स्थानिक प्रश्नांना बगल देण्यात आली. मोदी आणि 370 सारख्या मुद्द्यावर सातत्याने उपस्थित नेत्यांनी भाषणे झाडल्याने उपस्थित नागरिकांचा उत्साह ओसरल्याचे चित्र होते.
डॉ. सत्यपाल सिंग यांनीही प्रदीप शर्मा यांना ‘अपने उत्तर प्रदेश का उम्मीदवार’ म्हणून निवडून देण्याची घोषणा केल्याने डॉ. सत्यपाल सिंग वसईच्या एकतेला छेद देत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया जनमानसात उमटल्या आहेत.