नालासोपारा :- ओमिक्रॅानचे रुग्ण हे महाराष्ट्रात दररोज आढळून येत आहेत. त्याअनुशंगाने आता स्थानिक पातळीवरही प्रशासन सतर्कता बाळगत आहे. योग्य ती खबरदारी आता वसईतील शहरासह ग्रामीण भागात घेतली जात आहे. आता वसई तालुक्यात प्रवास करणऱ्या प्रवाशाला मास्क नसेल तर मात्र वाहनचालकालाही दंड आकारला जाणार आहे. म्हणजेच वाहनात येणाऱ्या प्रवाश्याने मास्क घातले आहे की नाही याची जबाबदारी चालकावरच राहणार आहे. नियम वेगळा असला तरी मनपा प्रशासनाचा उद्देश चांगला असल्याने वसईकर याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्य सरकारने कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी मोठा निर्णय जाहिर केला आहे. यानुसार राज्यात आता लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. मुंबईतील लोकलप्रमाणे एसटी, टॅक्सी, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर केवळ दोन डोस घेतलेल्यांना परवानगी असणार आहे. लसीकरणाबाबत नवी नियमावली प्रसिद्ध करत राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे.

सांगून झाले, आता दंडात्मक कारवाई…….

वसई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी, योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. यामध्ये आता नव्या व्हेरीयंटची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही वेगवेगळे नियम लादले जात आहेत. यापूर्वी ज्यांनी एकही डोस घेतला नाही त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आले आहे. हे सर्व करुनही प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद मिळत नसल्याने गेल्या सोमवारपासून दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. मनपा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनही कारवाई करीत आहे.

परवानाधारक वाहनांना नोटीसा………

कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी एक ना अनेक प्रयोग राबवले जातात. मात्र, नागरिक तेवढ्या सजगतेने राहत नसल्याने आता वेगवेगळे नियम ठरवून दिले जात नाहीत. म्हणूनच ऑटोरिक्षा, प्रवासी खासगी वाहतूक करणाऱ्या बसेस, स्कूल बस, टुरिस्ट टॅक्सी, परवानाधारक ऑटोरिक्षा या सर्वच प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांना आता प्रवाशांनी तोंडाला मास्क लावलेला आहे का? हे पाहूनच प्रवेश द्यावा लागणार आहे. अन्यथा प्रवाशाने मास्क घातलेला नसला तरी दंड हा वाहनचालकालाच भरावा लागणार आहे. त्यामुळे अधिकतर वसईकर हे मास्क वापरतील हा त्यामागचा उद्देश आहे.

मनपा, पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई……

अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे दंड आकारुन महसून गोळा करण्याचा उद्देश हा प्रशासनाचा नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कठोर निर्णय घेतले जात असल्याचे मनपा आयुक्तांनी यांनी सांगितले आहे. शिवाय मागील सोमवारपासून नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्याला दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ज्यांनी मास्क घातलेला नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी विनामास्क असलेल्या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई केली जात आहे.

दोघांनाही दंड………

तसेच या नियमावलीअंतर्गत कोरोनाचे नियम न पाळणार्‍यां विरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने आता मास्क वापरला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर दुकानात ग्राहकांने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500 आणि संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मॉल्समध्ये ग्राहकांने मास्क घातला नसेल तर मॉल्स मालकाला 50 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

तालुक्यातील एकूण प्रवासी वाहने….. (अंदाजित आकडेवारी)

खाजगी बस :- 300
स्कुल बस :- 170
टुरिस्ट टॅक्सी :- 100
काळीपिवळी टॅक्सी :- 10
परवानाधारक ऑटोरिक्षा :- 40 हजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *