
बढती मिळालेले वादग्रस्त लिपिक विजय गोतमारे फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी
विरार(प्रतिनिधी)-वसई विरार महापालिकेत लिपीक-
टंकलेखक या पदावर कार्यरत विजय विनोद गोतमारे या कर्मचाऱ्यावर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी २४ तासांपेक्षा जास्त काळ अटकेत होता. नियमानुसार त्याला बडतर्फ करणे आवश्यक असताना वसई-विरार महापालिकेने मात्र अभय दिले आहे. किंबहुना इतक्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यानंतरही त्याला वरिष्ठ लिपीक पदावर बढती देण्यात आली असल्याने महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसांत विजय विनोद गोतमारे याला सेवेतून बडतर्फ न केल्यास प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार विभागीय कार्यालयाबाहेर निषेध करण्यात येईल, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ वसई-विरार जिल्हाध्यक्ष महेश कदम यांनी दिला आहे.
२०१६ साली विजय गोतमारे याची वसई-विरार महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर लिपिक- टंकलेखक या पदावर नियुक्ती झाली होती. दरम्यानच्या काळात मौजे विरार स नं. ११२/०१,११२/०३,
११२/०४,११२/०५,११३/ पैकी, ११४/०५ व ११५/०३ या जागेवर बोगस कागदपत्रांद्वारे अनधिकृत बांधकाम करून त्यातील सदनिका ग्राहकांना विकून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विकासक म्हणून विरार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ३६ आरोपींत विजय गोतमारे याचाही समावेश होता. यात विजय गोतमारे हा क्रमांक चारचा आरोपी होता. तत्कालिन प्रभारी सहाय्यक आयुक्त मेरी तुस्कानो यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात भादंवि कलम ४२०,४६५,४७६,४७१,४७४,३४ सह महाराष्ट्र राज्य प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम-५३,५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. विशेष म्हणजे या प्रकरणी गोतमारे याला ०५ ऑगस्ट २०१६ रोजी अटकही झालेली होती.
२००८ ते २०१३ या काळात विरार सर्व्हे नं.११२/०१,११२/०३, ११२/०४, ११२/०५, ११३/ पैकी, ११४/०५ व ११५/०३ या जागेवर डीपी रोड व प्ले ग्राउंडचे आरक्षण असतानाही विजय गोतमारे व त्याच्या साथीदारांनी २० इमारती बांधण्यासाठी आराखडा तयार केला होता. पैकी या जागेत तळ अधिक चार अशा सात इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते. त्यासाठी सिडकोची खोटी बांधकाम परवानगी बनविण्यात आली होती. या इमारतीतील गाळे व सदनिकांची सहदुय्यक निबंधक वसई-०२ कार्यालयात दस्त नोंदणी करून त्यांची विक्री करण्यात आली होती. यात ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. सरतेशेवटी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विजय गोतमारे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली होती, अशी माहिती महेश कदम यांनी दिली. दरम्यान, इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही वसई-विरार महापालिका प्रशासनाने विजय विनोद गोतमारे याची वरिष्ठ लिपीक पदावर बढती केली आहे. या गुन्हे दाखल प्रक्रियेत विजय विनोद गोतमारे हा आरोपी म्हणून २४ तासांपेक्षा जास्त काळ अटकेत होता. त्यामुळे त्याला नियमाने आणि कायद्याने सेवेतून बडतर्फ करणे बंधनकारक होते; मात्र पालिकेने त्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करून त्याला अभय दिलेले आहे. ही भूमिका न्यायालाधरून नसल्याने व जनहितविरोधी असल्याने येत्या आठ दिवसांत त्याला बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी महेश कदम यांची आहे. अन्यथा; प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार विभागीय कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा महेश कदम यांनी दिला आहे.
विजय गोतमारे व अन्य अधिकारी- कर्मचाऱ्यांवर इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही पालिका त्यांना बडतर्फ किवा निलंबित करण्यात आलेले नाही. यातून पालिकेची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते, उलट गुन्हेगार कर्मचाऱ्यांना सेवेत बढती किंवा त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवून पालिका आयुक्त भ्रष्टाचाराला उत्तेजन देत आहेत. खरे तर ही सामान्य वसई-विरारकरांची फसवणूक आहे. या सर्व एकत्रित प्रकरणांत आम्ही लवकरच न्यायालयात दाद मागणार आहोत.
- महेश कदम, सरचिटणीस, भाजप विरार शहर मंडळ