
प्रतिनिधी :
सातबाराचे फेरफार मंजूर करण्यात तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी फेरफार मंजूर करण्याबाबतचे शासनाचे नियम, अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे. सदर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील वसई मंडळ, ससुनवघर तलाठी हद्दीतील गाव मौजे ससुनवघर सर्वे नंबर २३२/१/२ या भूखंडाचा फेरफार व बिनशेती आदेश दि. १५/२/२०२२ रोजी मंजूर करण्यात आला. फेरफार टाकल्याचे समजताच हरकत घेण्यात आली असून सदर हरकतीला न जुमानता मंडळ अधिकारी पृथ्वीराज होगाडे यांनी फेरफार मंजूर केला.
वसई तहसीलदारांना ४० गुंठेपर्यंतचा बिनशेती आदेश व फेरफार करण्याचा अधिकार असताना सदर प्रकरणात २ तुकड्यांमध्ये ५८ गुंठे जागेचा बिनशेती आदेश व फेरफार केला गेला. फेरफार मंजूर करण्याबाबतचे शासनाचे नियम, अटी व शर्तींचे उल्लंघन करण्यात आले असून असे अनेक भूखंडाचे सात बाराचे फेरफार व बिनशेती आदेश मंजूर करण्यात आले आहेत. सदर प्रकरणी जिल्हाधिकारी श्री. माणिक गुरसळ यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.