
नालासोपारा(जयंती पिलाने) : विरार पूर्वेकडील बरफपाडा येथे रस्त्याची चाळण झाली असून पालिकेचे दुर्लक्ष झाले असून पालिका नागरिकाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का असा सवाल नागरिक विचारत आहेत. रस्त्याची चाळणं झाल्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना त्या रस्त्यावरूनच जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता बनवण्यात आला होता. मात्र गेल्या ५ ते ६ वर्षांपासून आता पर्यंत या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीनी ढुंकून हि पहिले नाही. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. बरफपाडा हे गाव वसई विरार महानगरपालिकेच्या वॉर्ड नंबर १ मध्ये येत असल्याने स्थानिक नगरसेवकांनी आणि मनपा प्रशासनाने सुद्धा ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल आहे कि काय असा सवाल या गावातील नागरिक करीत आहेत.
तसेच रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढिगारा सुद्धा पाहवयास मिळतो आहे. त्यामुळे या रस्त्याला डम्पिंगग्राउंड चे स्वरूप आले असून रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर नगरसेवकांना या गावातील नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करता येत नसतील तर त्यांनी गावात मत मागण्यासाठी सुद्धा येऊ नये.असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
बरफपाडा परिसरातून वसई विरार महानगरपालिकेला लाखोंचा महसूल मिळतो पण नागरिकांच्या सुविधांकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत असून जर रस्त्याची डागडुजी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान वसई विरार पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही .त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
