

विरार: आगामी बोईसर, नालासोपारा आणि वसई विधानसभा निवडणूकांच्या मतदार यादीतील १९ हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत आहोत अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. वसई आणि बोईसर मतदारसंघाच्या तुलनेत नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक बोगस मतदारांची नोंद झाली असल्याचे ठाकूर यांनी विशद केले. यावेळी बविआचे आमदार क्षितीज ठाकूर, पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
जगाच्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीत आपण सगळे आहोत. त्यामुळे निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून तातडीने वगळण्याची गरज असल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले. तसेच १९ हजारांहून अधिक बोगस मतदारांच्या यादीतील मतदारांची पूर्ण नावे, त्यांचे वय व लिंग एकसारखे आढळल्यानंतर त्यातील निवडक २०० मतदारांची छायाचित्रे देखील एकसारखीच असल्याची खातरजमा करण्यांत आली असल्यामुळे १९ हजारांहून अधिक बोगस मतदारांच्या नावांबद्दल आमची खात्री पटली आहे. त्याचप्रमाणे जवळपास ५०० मतदार ओळखपत्र क्रमांकांच्या छाननीमध्ये आम्हाला असे आढळून आले आहे की, एकाच व्यक्तीकडे दोन वेगवेगळ्या मतदार संघातील मतदार ओळखपत्रे असल्यामुळे एकच मतदार दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान करण्याची शक्यता असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक बोगस मतदार नोंदणी झाल्याचे देखील त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी बोगस मतदारांची तातडीने चौकशी करण्यात यावी व त्यांच्या विरुध्द गुन्हे नोंदविण्यांत यावेत अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी केली.
गेली तीन दशकं आमच्या पक्षाने नालासोपारा, वसई तसेच बोईसर या परिसरांत अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत त्यामुळे जनतेचा आर्शीवाद नेहमीच आमच्यावर राहिला आहे. परंतु सध्या काही पक्ष मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदवून निवडणूका जिंकण्यात यशस्वी होत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे यापूर्वीही रितसर तक्रार केली असल्याचे ठाकूर म्हणाले.
*हे बोगस मतदार आले कुठून?*
प्रामुख्याने गेल्या ४ महिन्यात अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, चांदिवली या परिसरांतील बोगस मतदार नालासोपारा मतदारसंघात नोंदवण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज यांनी केला.