
तब्बल 4 एकर पेक्षा जास्त जागा केली गिळंकृत!
बविआचे माजी महापौर व दोन नगरसेवकांची हाकेच्या अंतरावर जनसंपर्क कार्यालये!
वसई : वसई-विरार महानगर पालिकेत शासकीय जागा गिळंकृत करणे हे म्हणजे राज-रोस पणे चालते की काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. वसई तालुक्यातील भूमाफिया कायदा मानतात का? असे प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. याचेच उदाहरण म्हणजे गाव मौजे आचोळे ता.वसई जिल्हा पालघर येथील जमीन सर्वे क्रमांक 271 क्षेत्र 1-64-0 ही जमीन मिळकत महसूल दप्तरी 7/12 उतारा गुरुचरण जमीन असल्याचे नोंद आहे ही जमीन मिळकत शासनाच्या मालकीची असून यावर बविआच्या कार्यकाळात भूमाफियांकडून गिळंकृत करण्यात आलेली आहे. यामागे मोठे षडयंत्र असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. या जमिनीची बाजार किंमत कोट्यावधीच्या घरात आहे.
याबाबतीत बहुजन महापार्टीचे संस्थापक महासचिव शमशुद्दीन खान यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, वसई -विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरण डी. यांना पत्रव्यवहार करून ही बाब लक्षात आणून दिली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी, या शासकीय जमिनीवर भूमाफियांनी बेकायदेशीरपणे गाळे व चाळी बांधून परप्रांतीय लोकांना विकण्याचा धंदा सुरु केला आहे. हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असून शासकीय जमिनीवर कोणीही अनधिकृत बांधकाम करत असेल तर त्या विरोधात तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा असे शासनाचे आदेश निर्देश संबंधित अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. शासनाच्या आदेशाची पायमल्ली येथील महसूल अधिकारी व महानगरपालिकेचे काही अधिकारी या ठिकाणी करत आहेत. शासनाच्या नावे असलेल्या जमिनीवर शासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही बांधकाम करता येत नाही याची माहिती संबंधित भूमाफिया लोकांना असून सुद्धा ते इसम कायदा न जुमानता बेधडक अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले आहे.सदर जागेमधील सर्व अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्काशीत करणे व अनधिकृत बांधकाम धारक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
तसेच या भूमाफियांना मदत करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
या बांधकामांना तत्कालीन बविआ च्या माजी महापौर व बविआ च्या नेत्याच्या सहभाग असल्याशिवाय एवढ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे भूमाफिया करूच शकत नाहीत. यामध्ये बविआचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रित्या सहभाग असून त्यांच्यावर ही कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.